नोकरीच्या आमिषाने तरुणाला ऑनलाइन गंडा

 


पुणे : नोकरीच्या आमिषाने चोरट्याने तरुणाला ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्याने तरुणाच्या बँक खात्यातून एक लाख २३ हजारांची रोकड लांबविली. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण नोकरीच्या शोधात होता. त्याच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने नोकरीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता. त्यानंतर चोरट्याने त्याला पुन्हा संदेश पाठविला. चोरट्याने दाखविलेल्या आमिषाला तरुण बळी पडला.

त्यानंतर चोरट्याने कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तातडीने पैसे जमा करावे लागेल, असे तरुणाला सांगितले. तरुणाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्याने खात्यातून एक लाख २३ हजार रुपये लांबविले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक केल्या प्रकरणी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय मोगले तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या