वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर आमच्यावर फोडू नका. सगळं जे वाईट होतंय, ते आमच्यामुळं आणि चांगलं घडतंय, ते तुमच्यामुळं असं होत नसतं, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 'मविआ'वर केली. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
'मविआ'वर टीका करत सामंत म्हणाले, वाईट झालं तर आमच्यामुळं झालं. ही राजकारणातली वाईट प्रवृत्ती आहे, तिचा मी जाहीर निषेध करतो. हा प्रोजेक्ट इथं आणण्यासाठी 8 ते 9 महिन्यांपासून प्रयत्न करत होतो. अनेक फायदेशीर योजना शासनासमोर ठेवल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वीच शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. वेदांताला आणखी काही देता येईल का, याविषयी चर्चा झाल्या. स्वतः अनिल अग्रवालजींशी फडणवीस यांनी चर्चा केली होती. पण, मागचा काही अनुभव पदरी आलेला असताना त्यांनी प्रकल्प गुजरातला हलवण्याचं ठरवलं.
6 महिन्यांत फक्त भेटीगाठी झाल्या. मात्र, कोणताही निर्णय होऊ शकला नाही. फॉक्सकॉन प्रकल्प येणार नाही, अशीच मविआची मानसिकता होती. मविआनं हाय पाॅवर कमिटीची मीटिंग घेतली नाही. हा 7 जानेवारी 2022 मधला अहवाल आहे. हा प्रकल्प गेलाय, याचं दु:ख आम्हालाही आहे. चांगलं झालं तर ते आमच्यामुळं झालं आणि वाईट झालं ते तुमच्यामुळं झालं ही प्रवृत्ती योग्य नाही, अशी टीका त्यांनी मविआवर केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींशी याबाबत चर्चा केली असून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलंय. कंपनीला वेळेत इन्सेंटिव्ह पॅकेज दिलं गेलं असतं तर हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेला नसता. परंतु, याचं खापर शिंदे आणि फडणवीस सरकारवर फोडलं जातंय, असा घणाघातही त्यांनी मविआवर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भविष्यात याच तोडीचा किंबहुना यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला, युवा पिढीला देऊ.. जो रोजगार अपेक्षित आहे, तो आम्ही उपलब्ध करून देऊ, असं आश्वासनही मुख्यमंत्री शिंदेंना दिल्याचं सामंतांनी सांगितलं.
0 टिप्पण्या