‘शिंदे गटातील १६ आमदार आमच्या संपर्कात’; चंद्रकांत खैरेंच्या दाव्याने चर्चांना उधाण

 


पैठणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन लोकं जमावले असल्याची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल क्लिपवरून चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. “शिंदेगटातील १६ आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच परत येतील. कोर्टाचा निकाल लागला की हे आमदार पुन्हा आपल्या मूळ शिवसेनेत येणार आहेत”, असं खैरे म्हणाले आहेत. चंद्रकांत खैरे यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेबाबत ऑडिओ क्लिप व्हायरल

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सभा होणार आहे. मात्र ही सभा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आली आहे. सुरुवातीला या सभेसंदर्भात एक पत्र व्हायरलं झालं होतं. तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना सभेसाठी उपस्थित राहण्याचे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले होते. मात्र हे पत्र बनावट असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन लोकं जमावले असल्याची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल क्लिपवरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. मिळालेल्या पैशांमधून सभेसाठी पैशांचं वाटप सुरू असल्याचा टोला खैरे यांनी लगावला आहे.

खैरेंच्या आरोपानंतर भुमरे आक्रमक

खैरे यांच्या या आरोपानंतर संदीपान भुमरे देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. पैसे वाटल्याचं दाखवून द्यावं असं थेट आव्हानच संदीपान भूमरे यांनी केलं आहे. संबंधित ऑडिओ क्लिप विरोधकांनीच बनवली असून त्यांनीच व्हायरल केली आहे. हे षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेकडून रचण्यात आलं आहे, असे आरोप भुमरे यांनी केले आहेत. मी याबाबत तक्रार करणार असून ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेणार आहे, असंही भुमरे यावेळी म्हणाले. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

काय आहे व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये

मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हयरलं झाली आहे. या क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवल्याचं ऑडीओ संभाषण आहे. गर्दी जमवण्यासाठी प्रत्येकी २५० रुपये देण्यात आल्याचं हे संभाषण आहे. या क्लिपमुळे खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या