पुणे : आम्ही अमेठी जिंकली आता बारामतीही जिंकणार, अशा शब्दांत भाजप नेते राम शिंदे यांनी थेट पवार कुटुंबियांना आव्हान दिलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांची बारामतीत आवक-जावक वाढली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नुकतीच बारामतीला भेट दिली होती. त्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बारामती दौऱ्यावर येणार आहेत.
सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याबाबत राम शिंदे म्हणाले, तीन दिवस केंद्रीय अर्थमंत्री बारामतीत येत आहेत. येत्या २२ सप्टेंबरपासून सीतारामन यांचा दौरा सुरू होत आहे. विभागीय आयुक्त कार्यालय येथे दौऱ्याविषयी आढवा बैठक होणार असून साडे सहा वाजत पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात १६ लोकसभा मतदार संघ जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. सर्व पदाधिकारी, नेते यांना यासाठी २१ कार्यक्रम दिले होते त्यांचं नियोजन झाले आहे. यामध्ये पहिल्या दिवशी ८, दुसऱ्या दिवशी ७ तर तिसऱ्या दिवशी १ असं नियोजन झालं आहे.
बारामती जिंकण्यासाठी आम्ही दोनदा प्रयत्न केले पण हारलो मात्र आता तिसऱ्या प्रयत्नात २०२४ ला बारामती लोकसभा जिंकणारच. भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीनं काम सुरु केलं आहे. जनतेचा आवाज भाजपच्या पाठीशी आहे. अडीच वर्षात इथल्या खासदार सुप्रिया सुळे या कुठे फिरल्या नाहीत. मात्र, सीतारामन येणार म्हटल्यावर त्यांनी फिरायला सुरुवात केली यातच सगळं आलं आहे, असंही राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
आम्ही अमेठी जिंकली आता बारामती ही जिंकणार! असा विश्वास व्यक्त करत बारामती हा काय बालेकिल्ला नाही, अशा शब्दांत शिंदे यांनी शरद पवार यांना अव्हान दिलं आहे. बारामतीचा उमेदवार ठरला आहे, त्याच नाव आहे भारतीय जनता पार्टी. हर्षवर्धन पाटलांचा योग्यवेळी सन्मान होईल, असंही यावेळी राम शिंदे म्हणाले आहेत.
0 टिप्पण्या