संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भारताचा दहशतवादाला तीव्र विरोध !



 न्यूयॉर्क/नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे अमेरिका दौऱ्यावर जात असून या आमसभेत दहशतवादविरोध, शांतता मोहिमा, पर्यावरण बदल, कोरोना लशींची सर्वांना समान उपलब्धता आणि बहुस्तरीय यंत्रणांच्या रचनेत सुधारणा हे भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर चर्चा होणार आहे. यासाठी भारताने जोरदार तयारीही केली आहे.

आमसभेला २० सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून हे ७७ वे सत्र असेल. जयशंकर हे सुमारे आठवडाभर अमेरिकेत असतील. ते २४ तारखेला आमसभेत भारत सरकारच्या वतीने बोलतील. याशिवाय, आठवडाभरात विविध द्विपक्षीय आणि इतर अशा जवळपास ५० बैठकांमध्ये ते सहभाग घेणार आहेत. परंपरेनुसार, आमसभेत ब्राझीलनंतर अमेरिकेचे अध्यक्ष भाषण करतात. मात्र, ज्यो बायडेन हे राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारासाठी ब्रिटन येथे आले असल्याने ते दुसऱ्या दिवशी बोलतील. आमसभेमध्ये भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक विषयांवर चर्चा होणार आहे.

आमसभेतील चर्चांमध्ये सहभागी होताना आणि भूमिका मांडताना ‘सन्मान, संवाद, सहयोग, शांती आणि समृद्धी’ या पाच ‘एस’वर भारत भर देणार असल्याचे भारताच्या कायमस्वरुपी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सांगितले. विविध सत्रांमध्ये बोलताना भारतातर्फे महिला विकासाच्या मुद्द्यावर आणि जगात शांतता निर्माण करण्याच्या गरजेवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बहुपक्षतावादाच्या मुद्द्यावर जी-४ या भारत, ब्राझील, जपान आणि जर्मनी या चार देशांची परराष्ट्र मंत्रिस्तरीय बैठक एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या विस्ताराबाबत एल-६९ समूहाची उच्चस्तरीय बैठकही होईल. या एल-६९ समूहामध्ये आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, कॅरेबियन द्विपसमूह यासारखे विकसनशील देश सहभागी आहेत. याखेरीज क्वाड, आयबीएसए आणि ब्रिक्स देशांच्या बहुपक्षीय बैठकांसोबतच भारत-फ्रान्स-ऑस्ट्रेलिया, भारत-फ्रान्स-संयुक्त अरब अमिरात, भारत- इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया यासारख्या त्रिपक्षीय बैठकांमध्येही ते सहभागी होतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या