शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया.



 मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या वाद संपण्याचे नाव घेताना दिसत नाही, खरी शिवसेना कोणाची हा वाद अजूनही मिटलेला नसताना मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी मिळाली आहे. मुंबई हायकोर्टाने आज हा निर्णय दिल्यानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्यावर आता शिक्कामोर्तब झाले. यानंतर भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोर्टाने सांगितलं त्याप्रमाणे प्रशासन करेल, यापेक्षा जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही. कोर्टामध्ये पोलिसांनी आणि महानगरपालिकेने त्यांची भूमिका मांडली होती, त्यावर कोर्टाने निर्णय दिला आहे. त्यावर कोर्टाने दिलेला निर्णय पाळवा लागतो आणि तो पाळला जाईल असे फडणवीस म्हणाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था पाळली गेली पाहिजे याकरिता पूर्ण काळजी आम्ही घेऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उच्च न्यायालयातील शिवतीर्थाच्या लढाईत शिवसेनेला विजय मिळाला आहे, यानंतर शिवसेनेकडून आता न्यायालयीन लढाई जिंकली तशी येणाऱ्या अनेक लढाया आम्ही जिंकत राहू अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान याबद्दल विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी 'शुभेच्छा आहेत' या दोनच शब्दत उत्तर दिलं.

कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ज्यामध्ये त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं की, "दसरा मेळाव्याला उत्साहानं या पण या परंपरेला कुठेही गालबोट लागेल असं काहीही करु नका". उद्धव ठाकरे म्हणाले, विजयादशमीच्या दिवशी आमचा मेळावा होतो गेल्या ६६ सालापासून त्यासंबंधीच्या केसमध्ये आम्हाला विजय मिळाला आहे. मी म्हणतो न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरलेला आहे.

आता न्यायदेवतेनं आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे. त्याबद्दल मी तमाम शिवसैनिकांनी शिवसेनाप्रेमींना आणि माता-भगिनींना आवाहन करतो की, उत्साहात या...वाजत गाजत या...गुलाल उधळत या. पण शिस्तीनं या कुठेही आपल्या या तेजस्वी परंपरेला गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या