मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या आगामी विदर्भ दौऱ्यापूर्वी एक सूचक भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे १७ सप्टेंबरपासून राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीला जाऊन राज ठाकरे चाचपणी करणार आहेत. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज ठाकरे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना एक अत्यंत सूचक वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांना पत्रकारांनी 'तुम्ही रेल्वेने नागपूरला का जात आहात का, असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, सध्या काही डबे जोडण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे मी रेल्वेनेच नागपूरला जातोय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप मनसेशी थेटपणे युती करणार नसला तरी एकमेकांना पूरक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने मुंबईत १३५ ते १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर शिंदे गटासाठी ८० ते ९० जागा सोडल्या जाणार आहेत. शिंदे गट मनसेशी युती करून यापैकी काही जागा मनसेला देईल, अशी चर्चा आहे. येत्या २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या कायदेशीर लढाईचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर युतीसंदर्भातील हालचालींना आणखी वेग येऊ शकतो. मात्र, मुंबईतील निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि मनसेने एकत्र येऊन शिवसेनेला शह देण्याची रणनीती आखली आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यादृष्टीने राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा महत्त्वपूर्ण ठरू शकतो. राज ठाकरे नागपूरमध्ये असताना भाजपचे प्रमुख नेते त्यांच्याशी संवाद साधतात का, हे पाहावे लागेल.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीच्या दर्शनालाही गेले होते. मनसे, भाजप आणि शिंदे गटात वाढत चाललेली ही जवळीक नव्या राजकीय समीकरणांची नांदी मानली जात आहे.
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा कधीपासून?
राज ठाकरे १७ सप्टेंबर महाराष्ट्र दौऱ्याला आरंभ करणार आहे. नागपूरपासून राज यांचा दौरा सुरु होणार आहे. पक्षबांधणी करण्यासाठी राज ठाकरेंनी राज्यव्यापी दौरा हाती घेतला आहे. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती गाठून राज ठाकरे चाचपणी करणार आहेत. १७ आणि १८ सप्टेंबरला राज विदर्भात येतील. त्यांच्या या दौऱ्याच्या तयारीसाठी मनसेचे प्रवक्ते माजी नगरसेवक संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, अगोदरच चार दिवस नागपुरात येणार आहे, अशी माहिती मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिली होती.
0 टिप्पण्या