जेवण आणि रोख रकमेची व्यवस्था? अंबादास दानवेंचे गंभीर आरोप


एकनाथ शिंदेंच्या सभेला हजर राहणाऱ्यांसाठी नाष्टा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला पैठण मतदारसंघात एक सभा होणार आहे. या सभेला लोकांनी गर्दी करावी, यासाठी शिंदे गटाकडून भाडोत्री पद्धतीने लोकांना आणण्यात येत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. लोकांना सभेला आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था, नाष्टा, जेवण आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे, असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

मुख्यमंत्र्यांच्या सभेवर भाष्य करताना अंबादास दानवे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांची १२ तारखेला पैठणमध्ये सभा आहे. या सभेसाठी सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना हजर राहण्याच्या सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहे. हे पत्र ८ सप्टेंबरला जारी करण्यात आलं आहे. मी यासंदर्भात जिल्हा परिषदेचे सीओ गटणे यांच्याशी चर्चा केली आहे. ते या प्रकरणाची सविस्तर चर्चा करतील. परंतु हा दुर्दैवी प्रकार आहे, असं मला वाटतं. पायाखालची वाळू सरकल्यानंतर जनता पाठिंबा देत नाही, त्यानंतर अशा पद्धतीने शासकीय यंत्रणांचा वापर करणं चुकीचं आहे.”

“शासकीय यंत्रणा कोणाच्याच मालकीची नसते. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सचे प्रश्न सोडवायचे सोडून त्यांना सभेसाठी हजर राहण्यास सांगितलं जात आहे. अंगणवाडी आणि आशा सेविकांचे वेळेवर वेतन मिळत नाही, असे त्यांचे अनेक प्रश्न आहेत. याबाबत संभाजीनगरच्या स्थानिक पत्रकारांना बोललं तर सभेसाठी रेटकार्ड प्रसिद्ध झाल्याची माहिती मिळाली. पैठणचे लोक सभेला येणार नाहीत, म्हणून बीड जिल्ह्यातील गेवराई आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव या दोन तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाहनं भरून सभेला लोकं आणण्याचा प्रकार सुरू आहे” असे आरोप दानवे यांनी केले आहेत.

“काही दिवसांपूर्वी पैठणला आदित्य ठाकरेंची सभा झाली होती. या सभेनंतर संदीपान भुमरे पहिल्यांदा पैठणला गेले. त्यावेळी त्यांच्या सभेसाठी जेमतेम समोरच्या शंभर खुर्च्यादेखील भरल्या नव्हत्या. त्यामुळे चवताळून या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेचीही फजिती होत आहे. मी याबाबत जबाबदारीने बोलतोय, एकनाथ शिंदेंच्या सभेसाठी निघताना गाडीची व्यवस्था, नाष्ट्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, आणि सभा झाल्यानंतर काही रकमेचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. नेमकी रक्कम किती देण्यात येणार आहे? हे मी प्रत्यक्ष तुम्हाला १२ तारखेला सांगेन” असंही दानवे यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या