केंद्र सरकारने देशातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारने मोफत रेशन देणाऱ्या योजनेची मुदत अजून तीन महिने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची मुदत ३० सप्टेंबरला संपणार होती. या अगोदरच, सरकारने या योजनेला तीन महिन्यांसाठी म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही मोठी भेट दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्येही ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तीन महिन्यांसाठी मोफत रेशनची योजना पुढे वाढवल्यामुळे तिजोरीवर 45,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्र सरकारने शिल्लक धान्याच्या साठ्याचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सरकारकडे धान्याचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या अगोदर मोफत रेशनची योजना आता बंद होईल, अशी चर्चा होती.
येत्या काळात गुजरात आणि हिमाचलमध्ये निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत योजनेला तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय हा निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना या नावाने ही योजना सुरू केली होती. या अंतर्गत दर महिन्याला प्रति व्यक्ती ५ किलो मोफत रेशन दिले जाते.
0 टिप्पण्या