लंपीग्रस्त जनावरांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, विलगीकरण केंद्र सुरू करणार ! राज्यात आता आणखी एका नव्या आजाराने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. हा आजार जनावरांमध्ये आढळून येत असून, मोठ्या प्रमाणात वाढताना देखील दिसत आहे. ‘लंपी स्किन डिसीज’ असे या आजाराचे नाव असून त्वचेशी संबंधित असणाऱ्या या रोगामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात गुरांचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रातही या आजाराचा शिरकाव झाल्याने राज्य शासन सतर्क झाले असून, या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (शुक्रवार)एक नवीन माहिती दिली आहे. राज्यात आता लंपीग्रस्त जनावरांसाठी विलगीकरण केंद्र निर्माण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत.

औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “लंपीच्या बाबतीत राज्य शासन अतिशय गंभीर आहे. आमचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांची टीम यावर काम करत आहे. सर्व अधिकारी, डॉक्टर, पशुपालन विभागाला सविस्तर सूचना दिलेल्या आहेत आणि लस देखील मोठ्याप्रमाणवर उपलब्ध केलेली आहे. डॉक्टर देखील मोठ्याप्रमाणावर उपलब्ध केले आहेत. कुठेही लसीचा तुटवडा नाही.”

याशिवाय, ज्यांच्या जनावारांचा मृत्यू होईल, त्यांना देखील एनडीआरएफच्या निकषांनुसार नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचबरोबर याचा प्रसार वाढू नये म्हणून विलिगीकरणासारखा एक वेगळा विभाग जनावरांसाठी करावा लागेल, अशा सूचना मी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.” असंही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी सांगितलं.

तर, “लंपी आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई मिळावी. पशुधनाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होऊ नये. या आजाराला विमा संरक्षण नसल्याने ते मिळवून देण्यासाठी सरकारने विमा कंपन्यांशी चर्चा करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणी या अगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या