“तो मारुतीही देवळाबाहेर येऊन हसत विचारत होता…”
गेल्या दोन दिवसांपासून भाजपाच्या मिशन बारामतीची राज्याच्या राजकाणात चर्चा सुरू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यादरम्यान २०२४ च्या निवडणुकांमध्ये बारामतीची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावर प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “बावन कुळे सोडा, लाख कुळे आली तरी शरद पवारांच्या पायाच्या नखावरची धूळसुद्धा उडणार नाही”, असं आव्हाड म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळेंनी बारामती दौऱ्यादरम्यान ‘गड वगैरे कुणाचा नसतो’, असं विधान करून राजकीय चर्चेची राळ उडवून दिली होती. “देशात अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. जेव्हा संघटना मजबूत होते, तेव्हा संघर्ष करण्याची ताकद येते. जेव्हा ती ताकद येते, तेव्हा अनेक चांगले गड उद्ध्वस्त होतात, हा देशाचा इतिहास आहे. त्यामुळे कुणाचा गड, वर्चस्व राहात नाही. वेळेनुसार ते बदलत असतं. आम्ही ठरवलंय की आमची ताकद तेवढी वाढवायची आणि आमच्या भरंवशावर शिवसेना-भाजपानं चांगली कामगिरी करायची आणि ही जागा निवडून आणायची”, असा निर्धार बावनकुळेंनी व्यक्त केला. यावेळी बावनकुळेंनी काटेवाडीतील मारुती मंदिरात दर्शन देखील घेतलं.
“पवारांचं नाव घेतल्याशिवाय…”
दरम्यान, बावनकुळेंच्या या विधानानंतर आव्हाडांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “१९९० नंतर शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही हे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उमगलं. त्यानंतर जे कधी सत्यात उतरले नाहीत असे खोटेनाटे आरोप सातत्याने, बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही, असं आपल्या ट्वीटमध्ये आव्हाड म्हणाले आहेत.
“आजही काहीजण परत एकदा शरद पवार आणि बारामती यांच्याबद्दल बोलत आहेत. गड उद्ध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत. विसर्जन करू म्हणत आहेत. अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा म्हणून”, असा टोला आव्हाडांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाला लगावला आहे.
“ते आत्ता आलेले कोण होते?”
“बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारुतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. ६० वर्षे प्रत्येक निवडणुकीचा फॉर्म शरद पवार याच मारुतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते?”, असा खोचक टोला आव्हाडांनी ट्वीटमधून बावनकुळेंना लगावला आहे.
“बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही. उद्धारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे”, असंदेखील ट्वीटमध्ये शेवटी आव्हाडांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपाचं मिशन बारामती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे.
0 टिप्पण्या