नवी दिल्ली : येत्या २६ सप्टेंबर रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडी नेते लालू यादव सोनिया गांधी यांची भेट घेऊ शकतात. नितीश कुमार दिल्लीत आले तेव्हा त्यांनी सोनिया गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता नितीश कुमार आणि लालू यादव एकत्र सोनिया गांधींना भेटणार असल्याचं समजतं.
या व्यतिरिक्त नितीश कुमार, तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते 25 सप्टेंबर रोजी हरियाणातील सिरसा जिल्ह्यात चौधरी देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त एकत्र येणार आहेत. मात्र या कार्यक्रमासाठी काँग्रेसला निमंत्रित करण्यात आलेले नाही.
दुसरीकडे सीपीआयएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी बुधवारी पाटण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि विरोधी ऐक्याबाबत चर्चा केली. जनता दल (युनायटेड) नेते नितीश कुमार यांनी या महिन्याच्या सुरुवातीला येचुरी यांची दिल्ली भेटीदरम्यान भेट घेतली होती.
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारीही विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. सीएम नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बिहारमधील आरजेडी नेते नितीश कुमार यांना पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य नेते मानतात.
0 टिप्पण्या