नंदुरबार : नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व पालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप व शिंदे गट एकत्र लढतील. राज्यातील सरकार जसे रात्रीतून बदलले तसेच काही बडे नेते रात्रीतून भाजपमध्ये दिसतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
श्री. बावनकुळे मंगळवारी (ता. १३) नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, युवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, डॉ. शशिकांत वाणी आदी उपस्थित होते.
सध्याचे सरकार शिंदे-फडणवीस सरकारची बुलेट ट्रेन असून, जुने सरकार तीनचाकी रिक्षा होती. त्यामुळे विकासाच्या कामात निश्चितच फरक दिसेल, असे सांगत बावनकुळे म्हणाले, ‘‘राज्यातले विरोधी पक्षाचे नेते सत्ता गेल्याने बावचळले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काहीच केले नसल्याने त्यांच्या आरोपांची दखल का घ्यावी? त्यांचे आरोप फक्त प्रसिद्धीसाठी आहेत. याकूब मेननच्या कबरीचे सुशोभीकरण हे उद्धव ठाकरे सरकारच्या काळातच झाल्याने त्यांनी जनतेची माफी मागावी.’’
नंदुरबार पालिकेसह जिल्ह्यातील सर्व पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच आगामी सर्व निवडणुकांबाबत नंदुरबार जिल्ह्यातील भाजप व शिंदे गटात गेलेले नेते यांच्याशी चर्चा करून समन्वयाने याबाबत निर्णय घेण्यात येईल. आपापसांत असणारे मतभेद मिटवून एकत्र निवडणुका लढविल्या जातील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
स्थानिक संस्था तसेच येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ४५ प्लस खासदार, २०० प्लस आमदार आम्ही महाराष्ट्रात निवडून आणणार आहोत. पंतप्रधान गरीब कल्याण योजना गरजू लोकांना पोचल्या पाहिजेत. मधल्या काळात कोणत्याही योजनेचा लाभ पोचला नाही. प्रत्येक खात्याचा निधी त्यासाठीच संपूर्णपणे खर्च झाला पाहिजे. दुसऱ्या खात्याकडे वर्ग होता कामा नये याची काळजी घेतली जाईल. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये गांधीजींचा एकही विचार दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
0 टिप्पण्या