भाजपचं मिशन युपी : सोनिया गांधीच्या मतदारसंघासह १५ मतदारसंघांसाठी भाजपानी कंबर कसली ! अमित शहांचा हा वार किती यशस्वी ठरेल ?



 लखनऊ : सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील गमावलेल्या जागा पुन्हा मिळवण्यासाठी भाजपनं खास रणनिती आखली आहे. याद्वारे या मतदारसंघांच्या लोकसंख्येबाबत अभ्यास केला जाणार आहे. त्याचबरोबर सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तळागळात पक्ष पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.


सूत्रांनी म्हटलंय की, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी भाजपच्या हायकमांडसोबत चर्चा केली. यामध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा समावेश आहे. खरंतर भाजपचा हा प्लॅन देशभरातील १४४ लोकसभा मतदारसंघांसाठी आखण्यात आला आहे. पण उत्तर प्रदेशातील गमावलेल्या जागांवर विशेष फोकस करण्यात आला आहे.


तीन स्तरीय कार्यपद्धती राबवणार


या रणनीतीतील पहिल्या स्तरामध्ये मध्यवर्ती नेतृत्वाचा समावेश असेल यामध्ये शाह, नड्डा आणि संतोष यांचा समावेश असेल. हे नेते दुसऱ्या स्तरातील नेतृत्वासोबत चर्चा करतील. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यूपी भाजप अध्यक्ष भुपेंद्र चौधरी आणि यूपीचे भाजप सरचिटणीस धरमापल सिंग सैनी यांचा समावेश आहे. यानंतर तिसऱ्या स्तरामध्ये केंद्रीय मंत्री ज्यांना भाजपनं गमावलेल्या यूपीतील मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यांचा समावेश असेल. यामध्ये हायप्रोफाईल मतदारसंघांचाही समावेश असेल, जसं की रायबरेली आणि मैनिपूरी. दरम्यान, भाजपनं नुकताच आझमगड आणि रामपूर हे मतदारसंघ समाजवादी पार्टीकडून जिंकले आहेत. हा भाजपसाठी मोठा विजय होता.


हे आहेत हायप्रोफाईल मतदारसंघ


दरम्यान, तिसऱ्या स्तरातील मंत्र्यांपैकी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना रायबरेलीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मतदारसंघात सध्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी खासदार आहेत. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर सहारनपूर तर पीएमओतील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे मैनिपूरीची जबाबदारी देण्यात आली आहे. मैनिपूर या मतदारसंघातून मुलायम सिंह यादव खासदार आहेत. तसेच केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्यावर जानुपूरची जबाबदारी देण्यात आली आहे.


आरएसएस करणार मदत


हे मंत्री राज्य नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वमध्ये सेतूची भूमिका बजावणार आहेत. दर आठवड्याला हे मंत्री आपले स्वतंत्र अहवाल सादर करणार आहेत. तसेच यूपीचे सरचिटणीस अमर पाल मौर्य यांच्यावर या मंत्र्यांना इनपूट देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासर्वांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते आणि तळागळातील कार्यकर्ते मदत करणार आहेत. तसेच ज्या मंत्र्यांना मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांनी दर महिन्याला मतदारसंघात भेट देणं आवश्यक असून एखादा दिवस-रात्र तिथं घालवणं गरजेचं असल्याचंही भाजपच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या