स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी मनसेचा विदर्भदौऱ्यापासून श्री गणेशा !!मुंबई
 : राज ठाकरे यांच्या ऑपरेशननंतर मनसेने आपला पहिलाच दौरा आयोजित केला असून त्यामध्ये विदर्भाला लक्ष्य केलं गेलं आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यासाठी रवाना झाले असून मुंबईतल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर त्यांना निरोप देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून त्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या हाडाच्या ऑपरेशननंतर हा त्यांचा पहिलाच विदर्भ दौरा आहे. विशेष म्हणजे ते ट्रेनने प्रवास करत विदर्भाला रवाना झाले आहेत.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेसाठी कुणाशीही युती न करता लढणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांचं लक्ष्य विदर्भ असल्याचं समजतंय. त्याच दृष्टीकोनातून आपल्या कार्यकर्त्यांना सूचना आणि पक्ष बळकटीसाठी त्यांनी हा दौरा आयोजित केला आहे. त्याचबरोबर ते एखाद्या राजकीय नेत्यांची भेट किंवा बैठक घेणार का याकडे लक्ष असणार आहे.

दरम्यान, गुढीपाडव्याच्या सभेमधील मशिदीवरील भोंग्याच्या वक्तव्यावरून ते चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांनी आयोध्या दौरा आयोजित केला होता. पण आजाराच्या कारणावरून त्यांनी हा दौरा रद्द केला होता. त्यानंतर आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचे त्यांचे लक्ष्य असून ते विदर्भासाठी रवाना झाले आहेत. त्यांच्या विदर्भ दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत अविनाश अभ्यंकर, सचिन मोरे, हर्षल देशपांडे, संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव हेसुद्धा उपस्थित असणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या