मुंबई : खरी शिवसेना कोणाची यांसह विविध मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळत निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ केली जाणार नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, खरं म्हणजे लोकशाहीत बहुमताला महत्व असतं हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णायनंतरॉ सिद्ध झालं आहे. आज बहुमत आमच्याकडे आहे, विधानसभेत आणि लोकसभेतही. या देशात जे काही निर्णय होत असतात जे घटना, कायदे यांवर आधारितच होत असतात. म्हणून आज सुप्रीम कोर्टानं देखील या सर्वच बाबींचा विचार करुन विरोधीपक्षाला जी स्थगिती पाहिजे होती ती फेटाळली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोग हा स्वतंत्र विभाग आहे. त्यामुळं काही निर्णय हे कोर्टाकडे तर काही निर्णय हे निवडणूक आयोगाकडे होत असतात. त्यामुळं निवडणूक आयोगानं ऐकायचंच नाही अशी जी काही मागणी होती ती सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.
जे घटनातज्ज्ञ होते त्यांनाही असं वाटत होतं की, आमची बाजू योग्य होती. त्यामुळं शेवटी सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्याचं आम्ही स्वागत करतो. खरंतर सदस्यत्व रद्दबातल करण्याच्या ज्या काही नोटीसा आमदारांना दिल्या गेल्या होत्या त्या चुकीच्या होत्या. महाविकास आघाडी सरकारनं वाट्टेल तसे निर्णय घेतले होते, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.
0 टिप्पण्या