“दसऱ्याच्या आधी याकूबच्या कबरीला…”, मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान; म्हणाले, हिंदूत्ववादी कधी…”


मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचे दिसून आलं. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. भाजपा नेत्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. तर, शिवसेनेकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यात आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतवृत्वाखाली महाराष्ट्रात सुशासन परत आलं आहे. दोन वर्षे हिंदू सणांवर आक्रमण करण्याचं काम झालं. जे हिंदू होते ते कधी पुरोगामी झाले कळालं नाही,” असा टोला मोहित कंबोज यांनी शिवसेनेला लगावला आहे.

शिवाजी पार्कवर शिवसेना की शिंदे गट दसरा मेळावा घेणार?, यावरती मोहित कंबोज म्हणाले की, “दसऱ्याच्या आधी उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं पाहिजे, याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण का केलं. त्याच्या मागे नेमका काय उद्देश होता. फेसबुक लाईव्ह आणि ट्विटरच्या माध्यमातून ते खूप उत्तर देतात. याचं उत्तरही जनता त्यांना विचारत आहे,” असे आव्हान कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

याकूबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात देण्यात आली फाशी

१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकुब मेमनला न्यायालयाने दोषी ठरवले होते. क्षमायाचनेच्या याचिका फेटाळल्यानंतर याकूबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या बॉम्बस्फोट प्रकरणात याकूबचा भाऊ टायगर मुख्य संशयित आरोपी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात २५७ जणांनी आपला जीव गमावला होता. जवळपास १४०० हून अधिक नागरिक या स्फोटात जखमी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या