दसरा मेळाव्याच्या परवानगी वरून शिवसेनेचा आक्रमक आव्हान. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण तापलं आहे. नेमकी खरी शिवसेना कोणती? या मुद्द्यावरून अद्याप न्यायालयात तोडगा निघालेला नसताना मेळाव्यासाठी नेमकी परवानगी कुणाला द्यायची? या द्विधा मनस्थितीत प्रशासन असल्याचं दिसून येत आहे. २२ ऑगस्ट रोजी यासंदर्भात परवानगी मागणारं पत्र शिवसेनेकडून सादर करण्यात आलं असताना त्यावर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. त्यानंतर शिंदे गटाकडूनही परवानगीसाठी पत्र दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता हा वाद अजूनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते मिलींद वैद्य यांनी आज पालिकेच्या जी-नॉर्थ विभाग कार्यालयात जाऊन मेळाव्याच्या परवानगीसंदर्भात विचारणा केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी गंभीर इशारा दिला आहे.

शिवाजी पार्कवर नेमका कुणाचा दसरा मेळावा होणार? यावरून वाद पेटलेला असतानाच आज शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालिकेच्या जी-नॉर्थ विभाग कार्यालयात भेट देऊन मेळाव्याच्या परवानगीसंदर्भात विचारणा केली. याबाबत बोलताना मिलींद वैद्य यांनी उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी शिवसैनिक जमतील, असं म्हटलं आहे.

“इथे विभाग अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं आहे. १६ तारखेला विधी खात्याकडे दसऱ्याच्या परवानगीबाबत वॉर्डनं विचारणा केली आहे. पण विधी खात्याकडून आजपर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत उत्तर देता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे परवानगी मिळो वा ना मिळो, उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी शिवसैनिक जमतील”, असं मिलींद वैद्य म्हणाले.

दरम्यान, जी-नॉर्थ कार्यालयात तैनात करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तावरही मिलींद वैद्य यांनी टोला लगावला. “एवढा मोठा पोलीस बंदोबस्त ही शिवसेनेची ताकद आहे. हे सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करतंय. मुख्यमंत्र्यांना शिवसैनिकांची किती भिती आहे, हे या बंदोबस्तावरून दिसत आहे. हे सरकार वेगळ्या पद्धतीने स्थापन झालं आहे. त्यांच्या मनात असेल त्या पद्धतीने काम करण्याची त्यांची वृत्ती आहे”, असं मिलींद वैद्य म्हणाले.

“दसरा मेळावा वर्षानुवर्षं शिवाजी पार्कमध्ये भरवला जातो. बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटायला शिवसैनिक इथे यायचे. त्यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक इथे यायचे. पण त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून सरकारची दडपशाही सुरू आहे. ही दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही. २२ ऑगस्ट रोजी दसरा मेळाव्याबाबत परवानगी अर्ज दिला आहे. पण त्याचं उत्तर अद्याप आलेलं नाही. परवानगी जर नाकारली, तर शिवसैनिक काय करेल, हे मी सांगण्याची गरज नाही. त्यासंदर्भातला आदेश उद्धव ठाकरे देतील.त्याचं आम्ही पालन करू”, असंही मिलींद वैद्य यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या