मुख्यमंत्र्यांच्या सभेत दम नव्हता; पैसे देऊन गर्दी जमवली.

औरंगाबाद : सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकाराची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. त्यानंतर कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत काही दम नव्हता असा टोला शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.

"कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत दम नव्हता. या सभेसाठी पैठण मतदारसंघातले लोकं फक्त २५ टक्के होते. बाकीचे लोकं हे फुलंब्री, सिल्लोड, पाथर्डी, शेवगाव अशा ठिकाणाहून आणले होते, हे मी पुराव्याशिवाय बोलत नाही." अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


यांच्यावर केली आहे. मला काल अनेक लोकांचे फोन आले, त्यांना ३०० रूपये आणि ५०० रूपये देऊन सभेसाठी नेण्यात आल्याचा दावा खैरे यांनी यावेळी केला.

दरम्यान, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासाठी कोपऱ्यात दोन खुर्च्या टाकायला हव्या होत्या असं वक्तव्य शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर, "मी मातोश्रीवरून त्यांच्यासाठी यापेक्षा चांगल्या खुर्च्या घेऊन येतो, त्यांनी आमच्याकडे यावं." असं प्रत्युत्तर खैरे यांनी दिलं.

"मुख्यमंत्र्यांच्या पैठण येथील सभेनंतर आम्ही मतदारसंघात जाऊन लोकांना भेटणार आहोत. लोकांशी चर्चा करणार आहोत, आम्ही वातावरण निर्मिती करणार आहोत. मी गेलो की वातावरण निर्मिती होते, कारण मी ओरिजनल आहे ना." असं खैरे म्हणाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या