राज्य कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी राज्य शासनाच्या आणि केंद्राच्या लागू होणाऱ्या सुट्टया आणि इतर सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र, यामध्ये दूर्लक्षित राहतो तो आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी 24 तास 365 दिवस तत्पर असणारा पोलीस दल. त्यात आता अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. त्यासाठी बाजारपेठा सजण्यास सुरूवात झाली आहे. तर अनेकांची खरेदीला सुरुवातही झाली आहे. या सर्वामध्ये धुळ्यातील एका पोलीस निरीक्षकाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहित एक मागणी केली आहे. सध्या या पत्राची जोरदार चर्चा असून, पोलीस कर्मचाऱ्याच्या या पत्रावर शिंदे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पोलीस निरीक्षकाचं पत्र नेमकं काय?
महोदय
सादर की मी आपणांस नम्रपणे विनंती करू इच्छितो की, शासनाच्या धोरणानुसार पोलीस दल वगळून इतर कर्मचान्यांसाठी फक्त ५ दिवसांचा आठवडा आहे याप्रमाणे वर्षात ५२ शनिवार येतात तसेच प्रत्येक इतर सर्वासाठी २४ शासकीय सुट्ट्या असतात. परंतु, पोलीस मात्र या ५२+२४७६ दिवस बारा-पंधरा तास दररोज कर्तव्यावर असतो, तस कायद्याने व माणुसकीने बघायला गेलं तर पोलिसांना ७६ दिवसांचा पगार दिला पाहिजे, परंतु आम्हा पोलिसांना व आमच्या कुटुंबीयांना संपूर्ण आयुष्य तडजोड करायची सवय असल्यामुळे तडजोड करून फक्त एक महिन्याचा पगार आम्हाला दिवाळी बोनस म्हणून मिळावा अशी विनंती शासनाला अनेक वर्षापासून करत आहे.! पण पोलिसांची संघटना नसल्याने व पोलिसांना कोणी वाली नसल्यामुळे शासनामार्फेत दखल घेतली जात नाही. पोलीस दलाची अवस्था अनाथा सारखी झाली आहे.!
सध्या महाराष्ट्रातील सर्व जनता म्हणते आहे की महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे दयाळू "अनाथांचा नाथ एकनाथ" आहे ! तसेच माननीय गृहमंत्री देवेंद्र फडनवीस साहेब हे देखील पोलिसांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष देतात! त्यामुळे आम्हा पोलिसांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व माननीय गृहमंत्री देवेंद्रजी साहेब यांच्याकडून ७६ दिवस बारा-पंधरा तास जास्तीचे कर्तव्य केल्यामुळे मोबदल्यात दया दाखवून देशातील इतर राज्यांप्रमाणे एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून देण्याची कृपा करावी अशी आपल्याकडून आम्हा पोलीसांची अपेक्षा असल्याचे या पोलीस निरीक्षकाने म्हटले असून, या कर्मचाऱ्याच्या पत्रानंतर आता शिंदे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचा ठरणार आहे.
0 टिप्पण्या