नाशिक बस अपघातात 12 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू !



 नाशिकमध्ये खासगी बसचा भीषण अपघात झालाय. चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये अपघातानंतर आग लागली. या आगीत काही प्रवासी होरपळ्याची भीती व्यक्त केली जातं आहे. तब्बल 12 प्रवासी या भीषण दुर्घटनेत जिवंत होरपळले आणि त्यांचा मृत्यू झालाय.

अपघात झालेल्या ठिकाणी बचावकार्य करण्यासाठी पोलीस, अग्निशमन यंत्रणा दाखल झाल्या आहेत. हा अपघात कसा घडला याबाबत महत्त्वाची माहिती समोर आलीय. पहाटे 4 वाजून 25 मिनिटांनी हा अपघात घडला. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस असून यवतमाळच्या पुसदकडून मुंबईकडं निघाली होती. मात्र, नाशिकच्या औरंगाबादरोडवरील मिरची हॉटेल जवळ बसचा अपघात झाला.

आयशर ट्रक आणि बसमध्ये जोरात धडक बसल्यामुळं हा अपघात घडला. अपघातानंतर बसला भीषण आग लागली. पाहता-पाहता ही आग पसरत गेली आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. अपघातावेळी बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते, त्यातील 12 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे.

बसमधील बाकीचे प्रवासी किरकोळ जखमी आहेत. जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडं उपचारांसाठी हलवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांनी दिली. महापालिका आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी झोन-1 च्या सगळ्या पोलिस ठाण्यातील पथकं कामाला लावली असून 3 पथकं घटनास्थळी दाखल झाले आहेत. उर्वरित तीन टीम जिल्हा रुग्णालयात आहेत. पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.

अतिशय भयंकर अपघात होता. मामा आणि काका सोबत जात असताना गाडीला अपघात झाला. आम्ही खिडकीतून उड्या घेतल्या. आम्ही लोक कल्याणला जात होतो. मामा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून माझी प्रकृती ठीक आहे. अतिशय भयंकर अपघातातून आम्ही वाचलो हेच सुदैव, असं पिराजी सुभाष धोत्रे (रा. अरणी, यवतमाळ) यानं सांगितलं.

मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका नव्हत्या, अशीही माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यामुळं सिटी बसमधून या अपघातामध्ये जिवंत जळालेल्यांचे मृतदेह नेण्याची वेळ ओढावली, असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. औरंगाबाद रोडकडून खासगी बस येत होते. बसमध्ये किमान 50 प्रवासी होते. त्यातील 25 प्रवाशांना आम्ही जळताना पाहिलं, असंही काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या