मराठी शाळांमध्ये 15 हजार 284 शिक्षकांची गरजपुणे- 

शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल परीक्षा परिषदेने नुकताच जाहीर केला. या परीक्षेत आणि यापूर्वी पार पडलेल्या टीईटी परीक्षेतील पात्र उमेदवारांना आता शिक्षक भरतीचे वेध लागले आहेत.

राज्यात आतापर्यंत पार पडलेल्या टीईटी परीक्षेतील 86 हजार 411 उमेदवार शिक्षकपदी नियुक्ती होण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची 31 हजार 472 पदे रिक्त आहेत.

राज्य सरकारने वर्ष 2017 मध्ये पवित्र पोर्टलद्वारे 12 हजार 47 शिक्षकांची पदे भरतीची योजना आखली होती. यांपैकी 6 हजार पदांवर भरती झाली. उर्वरित पदांची भरती प्रक्रिया अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाही. काही तांत्रिक अडचणींचे कारण देत उर्वरित पदांची भरतीचा मुहूर्त लांबविला जात आहे. राज्यात टीईटी पेपर 1 मध्ये पात्र असलेले 42 जार 786 उमेदवार प्राथमिक शिक्षकपदासाठी तर पेपर 2 मध्ये पात्र असलेले 43 हजार 625 उमेदवार माध्यमिक शिक्षकपदासाठी इच्छुक असून शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसले आहेत.

मराठी शाळांमध्ये 15 हजार 284 शिक्षकांची गरज
राज्य सरकारने मध्यंतरी कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. कमी पटसंख्येच्या सर्वाधिक शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. या शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने पालकच आपल्या पाल्याला मराठी शाळेत पाठवायला तयार नाहीत. काही शाळांमध्ये तर एक शिक्षक एकाच वर्गात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एकत्र शिकवितात. राज्यात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सध्या 15 हजार 284 शिक्षकांची आवश्यकता आहे. पालघर जिह्यात सर्वाधिक 1916, यवतमाळ 1307, रायगडात 1051, सातारा 1023 तर कोल्हापुरात 972 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर शिक्षकांची भरती झाल्यास या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या आपोआप वाढेल.

शालेय शिक्षण विभागासह समाजकल्याण, आदिवासी, अल्पसंख्याक विभागांतर्गत चालविण्यात येणाऱया आश्रमशाळा, वस्तीशाळांमध्येदेखील शिक्षकांची शेकडो पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्यात यावीत अशी आमची मागणी आहे. टीईटी पास उमेदवारांची अभियोग्यता चाचणी होणे बाकी आहे. परीक्षा परिषदेने टीईटीचा निकाल जाहीर केला. आता त्याचबरोबर अभियोग्यता चाचणीदेखील घेऊन पात्र ठरणाऱया उमेदवारांची लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवावी. - संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन

आतापर्यंत टीईटी पात्र उमेदवार
वर्ष उमेदवार
2013 31,072
2014 9,595
2015 8,989
2017 10,373
2018 9,677
2019 16,705
एकूण 86,411

प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे
जिल्हा परिषद 19,452
महापालिका शाळा 11,098
नगर परिषद 901
छावणा 21
एकूण 31,472


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या