उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कुणाच्या मेळाव्यासाठी लोकांची गर्दी जास्त ? मुंबई : शिवसेनेच्या दोन्ही गटांचा काल दसरा मेळावा पार पडला. यावेळी या दोन्ही मेळाव्यांना किती गर्दी झाली होती? याची आकडेवारी मुंबई पोलिसांनी जाहीर केली आहे. या आकडेवारीवरुन नक्की किती लोक मुंबईत शिवेसेनेच्या मेळाव्यासाठी आले होते, हे स्पष्ट झालं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे. 

दोन्ही गटांनी आपापल्या मेळाव्यांना किती गर्दी झाली याचे दावे केले आहेत. त्यानुसार, उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला अडीच लाख लोकांनी उपस्थिती लावल्याचं सांगितलं जात आहे. तर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला ३ लाख लोक उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण मुंबई पोलिसांनी हा दावा खोडून काढला आहे. कारण शिवाजी पार्क मैदानाची क्षमता ८० हजार तर बीकेसीची क्षमता १ लाखांची आहे. त्यामुळं कालच्या मेळाव्यांच्या गर्दीचा विचार केल्यास ठाकरेंच्या सभेला सुमारे १ लाख तर एकानाथ शिंदेंच्या सभेला दोन लाख लोक उपस्थित असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

दरम्यान, शिवाजी पार्क आणि बीकेसीतील दोन्ही मेळावे एकाच वेळी सुरु झाले. पण उद्धव ठाकरेंनी साधारण आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि त्यांनी साधारण पाऊण तासात आपलं भाषण उरकलं. तर ठाकरेंचं भाषण संपल्यानंतर एकनाथ शिंदेंचं बीकेसीत भाषण सुरु झालं. त्यानंतर त्यांनी तब्बल दीड तास भाषण केलं, पण आधीच उशीर झाल्यानं आणि भाषण लांबल्यानं बऱ्याच लोकांनी बीकेसीतून काढता पाय घेतला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या