मुरजी पटेल अपक्ष लढतील का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत. एकदा भाजपाचा उमेदवार होतो तो पक्षाच्या निर्णयाविरोधात जात नाही. ते भाजपाचे आणि युतीचे उमेदवार होते. त्यांच्यासंबंधी ही शंका घेण्याची गरज नाही”.
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेत, भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. राज ठाकरे यांनी मात्र भाजपाची विनंती अमान्य करीत उलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती करीत भाजपाची कोंडी केली होती. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं.
रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुख पदापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आमदार होण्याने रमेश लटके यांच्या आत्म्यास खरोखरीच शांती मिळेल. यामुळेच भाजपाने ही निवडणूक लढवू नये व त्यांच्या पत्नी निवडून येतील असे पाहावे, असंही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं होतं.
राज ठाकरेंच्या पत्रानंतर फडणवीसांनी सर्वांची मतं लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं. यानंतर भाजपा नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या होत्या. रविवारी रात्री फडणवीसांच्या घरी पार पडलेल्या या बैठकीमध्ये आशिष शेलार, अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित होते. भाजपाचं स्थानिक नेतृत्व ही जागा लढवण्यासाठी तयार असल्याचं आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांनी फडणवीस यांना कळवलं होतं. यानंतर सकाळीही देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ बंगल्यावर भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक अर्ज घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या ऋुतुजा लटके आणि भाजपाचे मुरजी पटेल यांच्यात लढत होणार होती. लोकप्रतिनिधींचे निधन झाले व त्यांच्या कुटुंबातील कोणी पोटनिवडणूक लढवीत असल्यास शक्यतो निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा असल्याचे सांगत पवार यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडली होती. दुसरीकडे ‘बाळासाहेबांची शिवसेने’चे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं होतं.
0 टिप्पण्या