मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या हातून शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गेलं. यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने यासाठी भाजपला जबाबदार धरण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस परवडली, असं विधान केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेसच्या काळातही शिवसेनेवर बंदीची चर्चा झाली होती. मात्र शिवसेनेचं काम पाहून बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला. काँग्रेसने देखील बंदी घातली नाही. जे काँग्रेसने केलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. मग पापी कोण, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारसह एकनाथ शिंदे गटाला केला आहे.
तुम्ही मुख्यमंत्री झाला, पक्ष फोडला ते ठीक आहे. पण आता यांना पक्षप्रमुख व्हायचं आहे. हे अति होतंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपला राग व्यक्त केला आहे. वास्तविक पाहता, उद्धव ठाकरे कधी संतप्त होताना दिसत नाही. मात्र आज त्यांनी आता बास म्हणत सूचक विधान केलं आहे.
यावेळी तीन चिन्हांचा पर्याय असल्याचं उद्धव यांनी म्हटलं. यामध्ये तिशूळ, मशाल आणि उगवता सूर्य याचा समावेश आहे. तसेच शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पर्याय सुचवल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
0 टिप्पण्या