उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्ग खुला, ते पण फक्त शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी !

 



जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसीतील दसरा मेळाव्यासाठी मोठी तयारी सुरु आहे. एकीकडे एसटीच्या बस गाड्या मोठ्या प्रमाणावर बूक करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता या मेळाव्यासाठी उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्ग खुला करण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे. सर्वसामान्यांसाठी या महामार्गाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नसताना नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा महामार्ग खुला केल्यानं आता शिंदे गटावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे. 

सर्वसामान्यांसाठी जो महामार्ग बंद आहे त्याच महामार्गावर अर्जुन खोतकर यांची मात्र बुधवारी रॅली निघाली. अर्जुन खोतकर यांच्यासह इतर नेत्यांच्या गाड्यांच्या ताफा दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे निघाला आहे. तो याच महामार्गवरुन रवाना झाला. म्हणजे जालना ते वैजापूरपर्यंत हा महामार्ग खुला करण्यात आला आहे. जालना ते वैजापूर १०० किमी अंतर आहे, पण हा मार्ग खास राजकारण्यांसाठी खुला करण्यात आला असल्याचं दिसून आलं आहे.

अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गाचं उद्घाटन अपुऱ्या कामांमुळं आणि काही तांत्रिक कारणांमुळं वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे. सर्वसामान्यांसाठी हा महामार्ग पुर्णपणे बंद होता. काही ठिकाणी पूर्ण काम झालेलं आहे, तिथं खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग बंद केलेला आहे. पण आता अशी माहिती मिळतेय की, काल हा महामार्ग खुला करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटातील मंत्र्यांसाठीच हा महामार्ग खुला करण्यात आला आहे का? असा सवाल काँग्रेस आमदारांनी उपस्थित केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या