Breaking News

समीक्षा जोशी एमबीए सीईटीमध्ये राज्यात प्रथम.

  श्रीरामपूर : शहरातील रहिवासी वर्षा जोशी यांची कन्या समीक्षा जोशी यांनी नुकत्याच झालेली एमबीए सीईटी प्रवेश परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम येत 100% गुण मिळवले. हा विक्रम करून श्रीरामपूरच्या या लेकीने श्रीरामपूर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याचेही नाव उंचावले.
समीक्षा जोशींचा हा अभ्यासाचा प्रवास जाणून घेताना त्यांनी मोकळ्या मनाने 'राष्ट्र सह्याद्री'शी बोलताना त्यांच्या या यशाचा प्रेरणादायी संघर्ष सांगितला. फायनान्सच्या आवडीमुळे त्यांनी ही परीक्षा निवडली. चांगला प्रतिष्ठित असलेला जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् (जेबीआयएमएस) कॉलेज मुंबई मधून एमबीए व्हायचं, हे विशेष कारण. शाळेच्या काळापासून समीक्षा स्कॉलर विद्यार्थीनी होती‌. समीक्षांनी या प्रवासाची सुरुवात 2020 पासून केली, आणि पहिल्यांदा ही परीक्षा 2019 ला दिली आणि त्यात 93% मिळवले. पण हे गुण जेबीआयएमएस कॉलेज साठी पुरेसे नाही, म्हणून न खचता परत 2022 च्या एमबीए सीईटी परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यात 100%  गुण मिळवत आपले ध्येय गाठले. 
या परीक्षेच्या अभ्यासासाठी 2020- 21 मध्ये जिगर पारेख या शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. आणि 2021-2022 (सीईटी 2022) साठी फक्त स्वयं अध्ययनाच्या जोरावर बाजी मारली. हे ध्येय गाठण्यासाठी दररोज समीक्षा सात ते आठ तास अभ्यास करायची. तिच्या अभ्यासात सातत्य असे. बी. कॉम  एम.कॉम च्या काळापासून इकॉनॉमिक्स, फायनान्स आणि अकाउंट्स या विषयांमध्ये तिची विशेष पसंती होती. पुढे चांगले करिअर करायचे आणि कुटुंबाचे नाव उंच करायचे, या विचाराने नाकारत्मक्तेला तिने शह दिला. या सगळ्यात आईकडून मिळालेले महत्त्वपूर्ण पाठबळ आणि सकारात्मकता या यशात मोलाची ठरली‌. भाऊ, मित्र-मैत्रिणी अशी ही निकटवर्तीय मंडळींनी तिचा आत्मविश्वास वाढवत तिच्या कष्टात पुढे जाण्यासाठी प्रवृत्त केले. 
जिममध्ये व्यायाम करणे, खेळणे, अश्या गोष्टींनी माईंड फ्रेश ठेवले. एमबीए केल्यावर विविध क्षेत्रात काम करून भारताची समाजाची गुंतवणूक धोरण, अर्थ-शिक्षितता धोरण यात सुधारणा करण्याचा तिचा ध्यास आहे. 


आपल्या मुलीने हे अभूतपूर्व यश मिळवलं, हे ऐकून आई खूप आनंदी झाली. समीक्षाच्या यशावर प्रतिक्रिया देतांना वर्षा जोशी म्हणाल्या "समीक्षा ला मेहनतीबरोबर नशिबानेपण साथ दिली." समीक्षाच्या आईने तिच्यातला कधीही कमी न होणारा आणि वाढतच राहणारा आत्मविश्वास ओळखला आणि तिला नेहमी आधार दिला. समीक्षामध्ये अभ्यासाची जिद्द यावी आणि आपलं ध्येय गाठण्याची प्रेरणा मिळावी यासाठी तिच्या आईने तिला मुंबईमध्ये स्थित तिचा ड्रिम कॉलेज जेबीआयएमएस दाखवून आणले, हा प्रसंग पुन्हा हे ठामपणे सिद्ध करतो की, लेकरांच्या विजयामध्ये आईचा सिंहाचा वाटा असतो. श्रीरामपूर येथे श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेत समीक्षाची आई वर्षा जोशी या संचालिका म्हणून कारभार सांभाळतात. पतसंस्थेच्याही विविध फायनान्सच्या कामात समीक्षा आईला मदत करत असे. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' ह्याचेच हे उदाहरण...!

  "कोणत्याही क्षेत्रात तुमचं प्रकटीकरण, सातत्य, गांभीर्य, 100% मेहनत हे सर्व तुम्हाला यशावर पोहोचवणार," असा संदेश समीक्षा जोशी हिने विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला. 

Post a Comment

0 Comments