नवी दिल्ली - मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. सत्यपाल मलिक म्हणाले की, मी अनेक शेतकरी नेत्यांच्या संपर्कात असून त्यांच्या पाठिशी उभा राहणार आहे.
एका यूट्यूब वृत्तवाहिनीशी बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले, “मी शेतकऱ्यांना सांगत आहे की तुम्ही खंबीर राहा. मी मित्राची भूमिका बजावत राहीन. पण मला वाटते शेतकरी पुन्हा संघटित होऊन लढतील. याचा शेतकऱ्यांना राजकीय फायदाही होणार आहे. कारण शेतकऱ्यांना कळून चुकलं की, त्यांच्या जमिनी जात असून त्यांच्या मालाला भावही मिळत नाही. शिवाय शेतकऱ्यांची मुलं सैन्यात जायची, आता ती आशाही संपल्याचं ते म्हणाले.
आपण शेतकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व करणार नसून त्यात सहभागी होणार असल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलं. पीएम मोदींवर निशाणा साधत सत्यपाल मलिक म्हणाले की, "प्रत्येक वेळी पीएम मोदी आणि सीएम योगी शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत आश्वासन देतात. परंतु आजपर्यंत थकबाकी मिळालेली नाही. ज्यांना लखीमपूर घटनेतील पीडितांना न्याय द्यायचा आहे, त्यांचा मला खूप अभिमान असल्याचं मलिक यांनी नमूद केलं.
आता पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या हितावर बोलत नाहीत. खटले मागे घेतले जातील, एमएसपी लागू होईल, असे त्यांनी स्वतः सांगितले होते, पण तसे केले नाही. जेव्हा गुजरातमध्ये होते तेव्हा ते 100 टक्के शेतकरी समर्थक होते, पण दिल्लीत आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं मलिक यांनी म्हटलं.
0 टिप्पण्या