औरंगाबादची स्वच्छ भारत अभियान रॅंकिंग मध्ये मोठी घसरण. औरंगाबाद : केंद्र शासनाने शनिवारी (ता. एक) स्वच्छ भारत अभियानाची रॅंकिंग जाहीर केली असून, त्यात महापालिकेचा टक्का आठने घसरला आहे. गतवर्षी महापालिकेला २२ वा रॅंक मिळाला होता. यंदा देशभरात ३० वी रॅंकिंग मिळाली आहे. राज्य पातळीवर दहा शहरांमध्ये औरंगाबादचा क्रमांक नववा आला आहे. केंद्र शासनाने गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवारी स्वच्छ भारत अभियानाचा निकाल जाहीर केला.

त्यात नेहमीप्रमाणे मध्यप्रदेशातील इंदूर शहराने सहाव्यांदा प्रथम क्रमांक पटकावला. ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा शहरांसाठी दरवर्षी केंद्र शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार विविध निकषांच्या आधारे ही स्पर्धा होते. स्पर्धेत सहभागी शहरांनी निकषानुसार काम केले आहे किंवा नाही, नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे हे पाहण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेली एजन्सी शहरात येऊन पाहणी करते. त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी एजन्सीचे प्रतिनिधी औरंगाबाद शहरात आले होते. त्यांनी पाच दिवस शहराच्या विविध भागात फिरून सर्वेक्षण केले.

या स्पर्धेचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. त्यात देशपातळीवर ४५ शहरांमध्ये औरंगाबाद शहराचा क्रमांक ३० वा आला आहे. गतवर्षी औंरगाबाद शहराचा बाविसावा क्रमांक होता. राज्य पातळीवर दहा शहरांमध्ये औरंगाबाद नवव्या क्रमांकावर आहे. गतवर्षी औरंगाबाद सहाव्या क्रमांकावर होते. देश व राज्य पातळीवर स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबादची घसरण झाली आहे. ‘टॉप टेन’चे होते स्वप्न यंदा टॉप टेनपर्यंत मजल मारण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली होती. साडेसात हजार गुणांच्या या स्पर्धेत सिटीझन्स व्हाइस, महापालिकेच्या सेवांचा दर्जा व कागदपत्रांचे सादरीकरण अशा तीन टप्प्यांमध्ये गुण देण्यात आले.

कोविड काळात महापालिकेने केलेल्या कामांना देखील गुण दिले जाणार होते. पण यंदा स्वच्छ भारत अभियानात महापालिकेला भरीव कामगिरी करता आली नसल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दुर्गंधीमुक्ती न झाल्याने बसला फटका केंद्र शासनाने दुर्गंधीमुक्त शहर करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मागेल त्याला स्वच्छतागृहासाठी अनुदान देण्यात आले. गतवर्षी या निकषांतर्गत औरंगाबादला ओडीएफ-प्लस प्लस असे रँकिंग मिळाले होते. यंदा केवळ ओडीएफ प्लस असे रँकिंग मिळाले आहे. त्यामुळे सुमारे चारशे गुणांचा फटका बसला आहे. त्यामुळे औरंगाबादची पीछेहाट झाली, असे सूत्रांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या