भीमा पाटस चा बॉयलर पेटणार!

 

तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यंदाचा गळीत हंगाम होणार सुरू! 
कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल कुल यांनी दिली माहिती!                                                       
  पाटस : 

दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. भिमा पाटस साखर कारखाना हा साई प्रिया शुगर (निराणी शुगर्स) या कंपनीला भाडेतत्वावर चालवायला दिला आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल कुल यांनी दिली. दरम्यान, कारखान्याचे गाळप चालू वर्षी सुरू होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. भीमा पाटस सहकारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै.मधुकर शितोळे यांचे चिरंजीव व कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे यांनी आमदार कुल यांना पेढा भरवुन याबद्दल अभिनंदन केले आहे. 
     भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा गाळप हे मागील तीन वर्षापासून बंद होते. तर कारखान्यावर कोट्यावधी रुपयांचे विविध बँकांचे कर्जाचा बोजा होता. कारखाना सलग तीन वर्ष बंद असल्याने आणि कारखाना बंद होण्यास कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल हेच जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार रमेश थोरात, माजी संचालक नामदेव ताकवणे यांच्यासह अनेक सभासदांनी केला होता. बंद असलेल्या भीमा पाटस कारखान्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी आमदारकुल यांना लक्ष केले होते त्यांच्यावर तीव्र टीका करीत गंभीर आरोप केले होते. ब्रह्मदेव आला तरी भीमा पाटस कारखाना सुरू होणार नसल्याची टीका ही माजी आमदार रमेश थोरात यांनी यापूर्वी जाहीर भाषणातून कुल यांच्यावर केली होती. भीमा पाटस सहकारी साखर कारखाना सुरू होणार नसल्याचा दावाही विरोधकांनी केला होता. मात्र कुल यांनी तीन वर्षाच्यानंतर का होईना भीमा पाटस कारखाना सुरू केल्याने कामगारांनी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्य सहकारी बँकेने भिमा पाटस कारखाना चालविण्यासाठी देण्याचा करार नुकताच झाला आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.२० ) रोजी सकाळी हा कारखाना साई प्रिया शुगर (निराणी शुगर) चे संचालक संगमेश निराणी यांनी कारखान्यास भेट देवुन संपुर्ण माहिती घेतली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल कुल, भिमा पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्वशिल शितोळे यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.
 साई प्रिया शुगर(निराणी शुगर) चे संचालक संगमेश निराणी यांनी पाहणी करताना कारखान्याचे कामकाज तात्काळ सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असून त्या दृष्टीने भिमा पाटसच्या कामगारांना उद्याच कामावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी भिमा पाटसचे अध्यक्ष आमदार राहुल कुल म्हणाले की, राज्य सहकारी बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रसिध्द केली होती. त्यानुसार साई प्रिया शुगरल(निराणी शुगर) ला निविदा मिळाली होती. कारखाना हा सहकारी तत्वावरच सुरू राहणार आहे.साई प्रिया शुगर (निराणी शुगर) यांना कारखान्यासाठी पुर्ण सहकार्य केले जाईल. यावेळी पाहणी करताना कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे यांनीही कारखाना लवकर सुरू करा व त्यासाठी आमच्याकडून जे सहकार्य हवे असल्यास ते आम्ही करु असे आश्वासन दिले.दरम्यान, आमदार राहुल कुल यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे दौंड ते माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की भीमा पाटस सुरू होतोय याचा आम्ही स्वागतच करू. मात्र हा कारखाना तीन वर्ष बंद का ठेवला याचे उत्तर कुल यांनी द्यावे, कारखान्यावर जिल्हा बँकेसह इतर बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुळी टाकून ३६ कोटी रुपये कारखान्याचे अध्यक्ष कुल यांनी घेतले तरीही कारखाना तीन वर्ष बंद का होता. हे ३६ कोटी रुपये कुठे गेले? हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे तो सहकारी तत्त्वावर चालू ठेवावा, ह्या कारखान्याच्या खाजगीकरणास आमचा विरोध राहील.  अशी प्रतिक्रिया माजी आमदार रमेश थोरात यांनी बोलताना व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या