राहुरी साखर कारखान्याबाबत खा.सुजय विखेंचा तनपुरेंना आव्हान.

 राहुरी : तनपुरे साखर कारखान्याचा सभासद नाही. तालुक्याबाहेरचा पाहुणा कलाकार आहे. कारखान्याची जबाबदारी सहा वर्षे यशस्वीपणे सांभाळली. आता तालुक्याने ज्यांना आमदार केले, मंत्री झाले, ज्यांच्या आजोबांच्या नावाने कारखाना आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा, जबाबदारी घ्यावी. मी तुमच्या ताब्यात कारखाना देतो, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख टाळून आव्हान दिले.

डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खासदार डॉ. विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे होते. उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील, उदयसिंह पाटील, श्यामराव निमसे, चाचा तनपुरे, तान्हाजी धसाळ, उत्तम म्हसे, शिवाजी डौले, आर. आर. तनपुरे, राजेंद्र उंडे, प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे उपस्थित होते.

विखे म्हणाले, की कामगारांच्या थकीत देणींसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने शासनातर्फे कारखान्याच्या जमिनीची लिलावप्रक्रिया होत आहे. त्यात आमचा संबंध नाही. मागील सहा वर्षांत मशिनरीचे आधुनिकीकरण केले. गाळपक्षमता अठराशेवरून चार हजारांपर्यंत वाढविली. अकरा वर्षांतील उच्चांकी गाळप, उच्चांकी साखरउतारा घेतला. कामगारांचे नियमित वेतन दिले. शेतकऱ्यांची राहिलेली ऊसबिले देणार आहे.

कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका, पत्रकार परिषद घेऊन कारखाना बचाव कृती समितीची स्थापना, आंदोलन, संघर्षाची गरज नाही. कारखाना तुमचा आहे. तुम्हीच चालवा. संचालक मंडळाची यादी द्यावी. स्वतःहून कारखान्याची जबाबदारी द्यायला तयार आहे. आम्ही भ्रष्टाचार केला असे वाटत असेल, तर कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे, असे ते म्हणाले.

कारखान्याच्या कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने साखरपोत्यामागे पाचशे रुपये टॅगिंग मागितले आहे. त्यामुळे सभासदांना योग्य ऊसदर देऊ शकत नाही. बँकेने पाचशेऐवजी साडेतीनशे रुपये टॅगिंगची अट ठेवून कारखाना चालविण्याची निविदा काढावी. राज्यातील कोणीही पुढे येणार नाही.‌ शंभर रुपये टॅगिंग मान्य केल्यास येत्या महिन्याभरात कारखान्याचा हंगाम चालू करू, असेही खासदार डॉ. विखे यांनी सांगितले. अप्पासाहेब ढूस यांनी कारखान्याची संलग्न संस्था श्री लक्ष्मीनारायण ट्रस्टची ५६ गुंठे जमीन एका महिलेने परस्पर विकल्याचा आरोप करून, चौकशीची मागणी केली. शेतकरी संजय पोटे, पंढरीनाथ पवार, सुभाष कणसे, अनिल शिरसाठ, भरत पेरणे, चांगदेव तारडे, भानुदास खुळे, कारभारी खुळे यांनी चर्चेत भाग घेतला. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.‌ संचालक सूरसिंग पवार यांनी आभार मानले.

कारखान्याला सहा महिन्यांपूर्वी ऊस दिला. उसाचे पैसे कधी देणार ते सांगा, असे एका शेतकऱ्याने भर सभेत कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे यांना विचारले. त्यावर ढोकणे संतप्त झाले. खासदार डॉ. विखे म्हणाले, की तुमच्या ऊसबिलाची माझी जबाबदारी आहे. तुम्ही मला खासदार केले. तुमचे पेमेंट थकवणार नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या