ऑम्लेट व्यवस्थित बनविता न आल्याने पोलिस हवालदाराकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न. पुणे : पत्नीला ऑम्लेट व्यवस्थित बनविता येत नसल्याच्या रागातुन पोलिस हवालदार पतीने पत्नीचा गळा दाबून तिचा खुन करण्याचा प्रयत्न केला. तर आईला वाचविण्यासाठी आलेल्या मुलालाही लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पोलिस हवालदाराला अटक केली आहे. मनिष मदनसिंग गौड (वय 50, रा. आंबेगाव बुद्रुक) असे अटक केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. मनिष गौड हा पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे. तर तो आंबेगाव बुद्रुक येथील दत्तविहार सोसायटीमध्ये राहण्यास आहे. बुधवारी (ता. 19) सायंकाळी सात वाजता गौड याच्या पत्नीने जेवणासाठी ऑम्लेट बनवले.

मात्र ते ऑम्लेट खराब झाल्यामुळे गौड याने पत्नीला "तुला ऑम्लेट व्यवस्थित बनवून देता येत नाही का ? असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने पत्नीला हाताने मारहाण करून फ्रिजवर ठेवलेली इलेक्‍ट्रॉनिक पक्कड उचलून फिर्यादीच्या डोक्‍यात मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर दोन्ही हातने फिर्यादीचा गळा दाबून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांची भांडणे सोडविण्यासाठी त्यांचा 22 वर्षीय मुलगा पुढे आला, त्यावेळी गौड याने मुलालाही लाथा बुक्‍क्‍यांनी जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

"पोलिस असलेल्या पतीचे त्याच्या पत्नीसमवेत काही वर्षापासून भांडणे सुरु आहेत. बुधवारी ऑम्लेट खराब झाल्याच्या कारणावरुन त्यांच्यात भांडणे झाली. त्यामध्ये त्याने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार, त्यास अटक केली आहे.''

श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या