हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, बारामती मध्ये लवकरच नाबार्ड व राष्ट्रीयकृत बँकाचे कॅम्प सुरू करणार. वालचंदनगर - शेतकरी व युवकांना बॅंकाच्या विविध योजनेचे लाभ मिळण्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघातील सहा तालुक्यामध्ये केंद्र व राज्यसरकारच्या माध्यमातून लवकर नाबार्ड व राष्ट्रीयकृत बॅकांचे मेळावे (कॅम्प) आयोजन केले असल्याची माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये एका दुकानाच्या उद्घाटनच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी पाटील यांनी सांगितले की देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकताच बारामती मतदार संघाचा दौरा केला आहे. त्यांनी शेतकरी,व्यापारी व युवकांशी चर्चा केली. तरुण पिढीचा शेती व्यवसायाकडे कल वाढत आहे.त्यांना नवीन योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. नुकतीच दिल्लीमध्ये सीतारामण यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बॅंक( नाबाॅर्ड ) व राष्ट्रीयकृत बॅकांच्या शेतकरी व युवकांसाठी विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ ग्रामीण भागतील अनेकांना मिळत नाही. २५ लाख रुपयापर्यंत विनातारण व विना जामीनदार मुद्रा लोन आहे.

मात्र बॅंका उच्च शिक्षीत व बी. एस. अ‍ॅग्री, बी. कॉम्म, अ‍ॅग्री डिप्लोमा झालेल्या युवकांना मुद्रा लोन देण्यास टाळाटाळ करीत आहे. कर्जासाठी जामीनदार,तारण मागत आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी रुपे क्रेडिट कार्ड, पशुपालन क्रेडिट कार्ड योजना असून याचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी १५ ऑक्टोबर पासून मेळाव्याचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. यामध्ये विविध राष्ट्रीयकृत बॅंकाचे अध्यक्ष,संचालक, बॅंकेचे अधिकारी सहभागी होणार आहेत. याचा फायदा शेतकरी व युवकांना होणार आहे. दिवसेंदिवस कुंटूबाची संख्या व लोकसंख्या वाढत असून शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. उत्पादन खर्च कमी करुन कमी क्षेत्रात जास्तीजास्त उत्पादन घेवून शेतीमधील उत्पादकता वाढविण्यासाठी उपयोग शेतकरी व युवकांना होईल. तसेच शेतीबरोबर जोड व्यवसाय ही करण्यास मोलाची मदत होणार असल्याचे सांगितले.

यावेळी पाटील यांनी सांगितले की, केंद्र व राज्यसरकारच्या शेतकरी,सर्वसामान्य नागरिक व युवकासाठी विविध योजना असून युवकांनी योजनांचा आभ्यास करुन जनजागृती करावी.तसेच योजनांचा लाभा घेवून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.

केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी धोरणे चांगली आहेत. युवा शेतकऱ्यांनी एकत्र येवून प्रोड्युसर सोसायटी,कंपनी तयार करावी. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये अ‍ॅग्री प्रोसेस इंडस्ट्रिजला महत्व आले असून उच्चशिक्षीत युवा शेतकऱ्यांनी अ‍ॅग्री प्रोसेस इंडस्ट्रिज सुरु करावी. यासाठी केंद्र शासानाकडून अनुदान ही मोठ्या प्रमाणात मिळत असून यासाठी लागणारी सर्वोपतरी मदत करण्याचे आश्‍वासन हर्षवर्धन पाटील यांनी दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या