आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्या फैसला? नवी दिल्लीः खरी शिवसेना कुणाची? या प्रश्नाने सध्या ठाकरे-शिंदे गटाला ग्रासून टाकलं आहे. ट्रकचे ट्रक भरुन पुरावे निवडणूक आयोगाकडे पाठवले जात आहेत. परंतु त्यापूर्वी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याचसंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्यासह देशाचं लक्ष या सुनावणीकडे लागून राहिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातलं राजकारण पूर्णपणे ढवळून गेलं. शिवसेनेचे ४० आमदार शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना, असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून केला जातोय. ठाकरे गटाकडून 'खरी शिवसेना आमचीच' असं म्हणत कागदांची लढाई लढली जात आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलेलं आहे. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत शिवसेनाला मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. तर शिंदे गटाला आयोगाने ढाल-तलवार हे चिन्ह दिलं.

'शिवसेना नाव आणि चिन्ह' याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग देणार आहे. मात्र आमदारांची अपात्रता आणि इतर कायदेशीर पेचांबाबत सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. त्याच अनुषंगाने उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आमदारांवर कारवाई होते का? कायदेशीर पेचांबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार? हे उद्या समजू शकतं.

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेण्यापासून आयोगाला रोखावे, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. कोर्टाने निवडणूक आयोगाला यासंबंधी कोणतीही कार्यवाही न करण्याचे आदेश दिले होते. याही निर्णयावर स्थापन केलेल्या घटनापीठाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घातलेली बंदी उठवली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उद्या सुप्रीम कोर्टात काय निर्णय होतो, हे पाहावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या