संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या २१ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता.



 नवी दिल्ली - संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन नवीन त्रिकोणाकृती संसद भवनातच होणार, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता अंधुक आहे. कारण नवीन संसद भवनाची इमारत उभी राहिली असली तरी भव्य इमारतीतील अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत व नोव्हेंबरच्या तिसऱया आठवड्यापर्यंत ती पूर्ण होणे केवळ अशक्य आहे. या एतिहासिक इमारतीच्या कामात कोणतीही घाई गडबड परवडणार नाही, असे या कामात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे. या स्थितीत हिवाळी अधिवेशनातील एखाद दिवस म्हणजे संविधान दिनाच्या बैठका नवीन इमारतीत घेऊन उर्वरीत अधिवेशन सध्याच्याच संसदेत चालविण्याचा पर्याय सरकारच्या मनात असल्याची निश्चित माहिती ‘सकाळ' ला मिळाली आहे.

या स्थितीत सरकारसमोर दोन पर्याय आहेत.

१) हिवाळी अधिवेशनातील राज्यघटना दिनासारखी (२६ नोव्हेंबर) एखादी महत्वाची बैठक नवीन संसदेत भरविणे.

२) नवीन संसदेतच हिवाळी अधिवेशन घेण्याचा हट्ट पूर्ण सोडून देऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक व राष्ट्रपतींचे अभिभाषण नवीन इमारतीत करायचे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या २१ नोव्हेंबरपासून (सोमवार) सुरू होण्याची शक्यता आहे. प्रथेनुसार २५ डिसेंबरच्या आत हे अधिवेशन संपवायचे असते. २०२० पासून नवीन संसदेचे बांधकामही २४ तास रात्रंदिवस सुरू आहे. सध्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार फक्त इमारतीच्या भिंती बांधून झाल्या की सारे काम झाले, हे साध्या घराबाबतही होऊ शकत नाही तर येथे एक भव्य सदन आकाराला येत आहे तेथे असे कसे होऊ शकेल. ब्रिटीशांनाही सध्याचे संसद भवन बांधण्यासाठीही जवळपास सात वर्षषे लागली होती. त्यांनी दूरदृष्टीने केलेल्या नियोजनात संसदेच्या चारही बाजूंना अशी विशाल मोकळी जागा सोडली होती की त्यापैकी कोणत्याही भागात सध्याइतकेच भव्य सदन बांधले जाऊ शकेल. त्यानुसार राज्यसभेच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला ६५ हजार स्वेअर फूट जागेवर नवीन संसद भवन आकाराला येत आहे.

संसदेच्या नवीन इमारतीचे काही बांधकाम नियोजित वेळेच्या पुढे जाणार हे आता निश्चित मानले जाते. लोकसभा व राज्यसभा सचिवालयांना, अधिवेशन नवीन इमारतीत होईल याबाबतची कोणतीही सूचना सरकारकडून अद्याप आलेली नसल्याची माहिती आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेची नवीन इमारत पूर्ण करण्याचे मोदी सरकारने लक्ष्य ठेवले होते. मात्र तो मुहूर्त गाठणे अशक्य असल्याचे प्रत्यक्ष बांधकामात सहभागी असलेल्यांचे म्हणणे आहे. सूत्रांनी सांगितले की ही इमारत म्हणजे आयुष्यात एकदाच येणारा, भव्य आणि गुंतागुंतीचा प्रकल्प आहे जो अत्यंत आव्हानात्मक वेळेवर बांधला जात आहे, चोवीस तास सुरू असलेल्या संसद भवनाच्या इमारतीचे ‘सिव्हील' काम जवळपास पूर्ण झाले आहे.

मात्र मध्यवर्ती वानुकूलन यंत्रणा, विद्युत जोडणी, भिंतीवरील भव्य शिल्पे-भित्तीचित्रे, गालिचे आणि इतर गुंतागुंतीची अनेक कामे अजूनही अपूर्ण आहेत. ती डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकत नाहीत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘सर पटक देंगे तो भी नवंबर में नयी संसद पूरी करहा तैय्यार नही हो सकती !‘‘ लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी अलीकडेच दिवाळीनिमित्त संसद भवन बांधकामात सहभागी असलेल्या अधिकारी व श्रमीकांची सदिच्छा भेट नुकतीच घेतली तेव्हा त्यांनाही वस्तुस्थिती स्पष्टपणे सांगण्यात आली व घाईघाई करणे योग्य नव्हे असेही सुचविण्यात आले अशी माहिती आहे.

नवीन इमारत अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत पूर्ण सज्ज होईल असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. नवीन संसदेची इमारत पूर्णपणे सुसज्ज झाल्यानंतरही प्रत्यक्ष अधिवेशन सुरळीत चालावे आणि खासदारांना सर्व मदत मिळावी यासाठी सचिवालयांच्या कर्मचार्‍यांना प्राथमिकदृष्ट्या प्रशिक्षित करण्यासाठी किमान १५-२० दिवस लागतील. यासाठी लोकसभा सचिवालय, राज्यसभा सचिवालय, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, आयटीडीसी आणि हाऊस किपिंग स्टाफसाठी मॉक ड्रिल आणि व्यायामाचे आयोजन करावे लागेल. हिवाळी अधिवेशनाची प्रस्तावित तारीख पहाता हे सारे पूर्ण होणे अशक्य असल्याचे स्पष्ट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या