‘भारत जोडो’तून महाविकास आघाडीची पेरणी!

 



सोलापूर : महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील काही नेतेमंडळी पक्षांतर करतील, अशी चर्चा सुरु झाली. भाजप व शिंदे गटाकडून तसे प्रयत्न देखील झाले. पण, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा राज्यात दाखल झाली आणि संपूर्ण वातावरणच बदलून गेल्याचे पहायला मिळाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा, लोकसभा निवडणुकीत विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारविरोधात राज्यभर महाविकास आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ बांधू लागले आहेत. त्याशिवाय विद्यमान सत्ताधाऱ्यांचा पराभव अशक्य मानला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात एकहाती सत्ता मिळवली. आता २०२३ च्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन व्हावे म्हणून राहुल गांधी यांनी देशभर ‘भारत जोडो’ यात्रा सुरु केली. यात्रेला सध्या चांगलाच प्रतिसाद मिळत असून अनेक राज्यातील स्थानिक पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यात सहभाग नोंदवला. महाराष्ट्रात ही यात्रा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पण यात्रेत सहभाग घेतला. आता काही दिवसांत उद्धव ठाकरे स्वत: आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यातील राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने देखील ‘भारत जोडो’ला पाठिंबा दिला. एकूणच काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा म्हणजे भाजप व त्यांचे समर्थक स्थानिक पक्ष वगळता उर्वरित सर्वच पक्षांना एकत्रित करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे आगामी सर्वच निवडणुका एकत्रित लढविण्याचा संदेश त्यातून दिला जात असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बरोबर प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे या देखील सहभागी झाल्या आहेत. एकाच दिवशी ११ किलोमीटर पायी चालत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी पण ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले आहे. आगामी काळात माजी केंद्रीय मंत्री शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होऊ शकते, असा सूर निघू लागला आहे. त्याचा निश्चितपणे भाजपला फटका बसेल, अशी शक्यता देखील वर्तविली जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या