संपर्कप्रमुख घोलप यांच्या विरोधात अश्लाघ्य वर्तन करणाऱ्या समाजकंटकांचा शिवसेनेशी संबंध नाही

 

नव्या निवडींना दिली स्थगिती; खासदार विनायक राऊत यांची माहिती...
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

संगमनेर

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्याबाबत काही समाजकंटकांनी अश्लाघ्य वर्तन केले आहे. असे वर्तन करणाऱ्या समाजकंटकांचा शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काहीही संबंध नाही. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती त्यांना स्थगिती देण्यात आली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये या संदर्भात मध्यवर्ती कार्यालयातून सचिव खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे नव्याने केलेल्या नियुक्ती यांना ब्रेक लागला असून आता शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नवे पदाधिकारी कधी जाहीर होतात, याची शिवसैनिकात उत्सुकता आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात पदाधिकारी निवडीवरून मोठा गहजब करण्यात आला. अकोलेत संपर्कप्रमुख माजी मंत्री बबननाना घोलप यांचा निषेध नोंदवत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे देखील आंदोलन करण्यात आले होते. संगमनेरमध्ये देखील घोलप यांच्या विरोधात बैठक घेत या निवडी आम्हा पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता केल्याचा आरोप करण्यात आला होता. यात शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी सामील होते.

याची पक्ष पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून नव्या नियुक्त्यांना तात्पुरता ब्रेक देण्यात आला आहे तर संपर्कप्रमुख घोलप यांच्या विरोधात अश्लाघ्य वर्तन करणाऱ्यांना समाजकंटक संबोधण्यात आले असून त्यांचा शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे घोलप यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. संगमनेर, अकोले, कोपरगाव मध्ये झालेल्या आंदोलनाचे पडसाद थेट पक्ष पातळीवर उमटले आहेत. त्यामुळे घोलप यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा शिवसेनेमध्ये (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदे मिळणार का? की त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखविला जाणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या