स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वक्तव्यावरून फडणवीसांनी राहुल गांधीना खडसावलं !

 



मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसच्या नेत्यांबद्दल मला प्रचंड आदर आहे, पण त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं भोगलं नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सावरकरांविरोधात विधान केलं आहे, त्यामुळं सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. 

फडणवीस म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील असे एक नेते आहेत ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कारावास भोगला आणि स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला. आजही काँग्रेसकडून त्यांचा विचार कारावासात टाकायचं काम सुरु आहे. रोज खोटं बोलायचं, रोज चुकीचं सांगायचं आणि निर्लज्जपणे वागायचं हे जे काही काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत. त्यांना राज्यातील जनताच उत्तर देईल"

स्वांतत्र्य लढ्यातील काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांबद्दल मला प्रचंड आदर आहे, यासाठी कोणी कमी केलं असेल कोणी अधिक केलं असेल. पण माझा सवाल आहे की, ज्या प्रमाणं अंदमानच्या कोठडीत दुहेरी काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना अकरा वर्षे जे अनन्वीत अत्याचार सावरकरांनी सहन केले, त्यात एक नेता मला दाखवा. हे अत्याचार सहन करत असतानाही ते सातत्यानं स्वातंत्र्यलक्ष्मीचंच गीत गात होते. सावरकर जर त्या अंदमानाच्या कोठडीत गेले नसते तर इतर सर्व कैद्यांनी आत्महत्या केली असती. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतात त्यांना कोणीतरी लिहून देतो. त्या राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 'स' माहिती नाही. ते किती वर्षे तुरुंगात होते ते ही त्यांना माहिती नाही. त्यामुळं त्यांना योग्य प्रकारे उत्तर दिलं पाहिजे आणि आपण ते त्यांना देऊ हा विश्वास मी तुम्हाला देतो, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

सावरकरांना हे माहिती होतं की, हा देश तोपर्यंत दुर्बल राहिल जोपर्यंत इथला हिंदू समाज आपली जातीव्यवस्था, वर्णभेद संपवून एकत्र होत नाही. तोपर्यंत या देशावर आक्रमण करण्याची कोणाची हिंमत नव्हती पण जेव्हा हा हिंदू समाज विभागला गेला त्यानंतरच या देशाला कधी मोगलांनी कधी इंग्रजांनी राज्य केलं, अशा शब्दांत त्यांनी सावरकरांबाबत भूमिका स्पष्ट केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या