चांगले शिक्षण द्या,नाहीतर ‘कोचिंग’ बंद पडतील;महसूलमंत्री विखे पाटील.



 अहमदनगर : सर्वत्र खासगी क्लासेसचे पेव फुटले आहे. पालकही लाख-लाख रुपयांचे शुल्क देतात. कारण त्यांना तिकडे मुलाचे भवितव्य दिसते. या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? शाळा-महाविद्यालयांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असताना दर्जेदार शिक्षण मिळत नाही, हे आपले अपयश आहे. शिक्षकांनी कार्यपद्धती बदलावी. आपण चांगले शिक्षण दिले तरच कोचिंग क्लासेस बंद पडतील, अशी अपेक्षा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशनाचे उद्‍घाटन राज्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाले. यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, मुख्याध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष जे. के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर, स्वागताध्यक्ष सुनील पंडित, शिवाजीराव काकडे, प्रा. भानुदास बेरड, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, संघाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब कळसकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, वसंत लोढा आदी उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले, ‘‘शिक्षकांच्या मागण्या व अधिकारासाठी आंदोलने होत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात काहीही गैर नाही. अनुदान त्यांच्या हक्काचे आहे, ते त्यांना दिलेच पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.’’

कर्डिले म्हणाले, मंत्री विखे शिक्षणमंत्री असताना शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले. अनेक विनाअनुदानित विद्यालये अनुदानित केली. पाटील म्हणाले की, मुख्याध्यापकाला कायम द्रौपदीची भूमिका बजावत शासन, संस्थाचालक, पालक, अधिकारी व विद्यार्थी या पाची घटकांना तोंड द्यावे लागते. शिक्षक व शिक्षकेतर बंदी उठवावी.

सूत्रसंचालन वीणा दिघे यांनी केले. आभार राज्य सचिव शांताराम पोखरकर यांनी केले. अधिवेशनाच्या ‘ज्ञानकलश’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी महानगर अध्यक्ष ज्ञानदेव बेरड, उपाध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी, मिथुन डोंगरे, निवृत्ती इले, राजेंद्र वाघ, राजेंद्र चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

कायम शब्दच काढला

कायम विनाअनुदानाबाबत मी योग्य भूमिका घेतली होती. कायम शब्द काढला होता. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांना २० टक्के, ५० टक्के असे टप्प्याटप्प्याने अनुदान मिळायला हवे होते. परंतु मागील सरकारने त्याचे पुढे काहीच केले नाही. शाळा आणि शिक्षकांनीही गुणवत्ता वाढविली पाहिजे. हजारो विद्यार्थी कोट्याला जातात, हे आपले अपयश आहे, असे मतही त्यांनी मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या