अदाणी उद्योग समुहाची बाजारात तब्बल 18 टक्के घसरण


मुंबई :
हिंडेनबर्गने जाहीर केलेल्या संशोधन अहवालामुळे अदाणी उद्योग समुहाची बाजारात घसरण सुरूच आहे. या अहवालात गौतम अदाणी आणि त्यांच्या उद्योग समूहावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याचे परिणाम आता बाजारात दिसू लागले आहेत. कंपनीने शुक्रवारी ३.४ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल गमावले आहे. आज दुपारपर्यंत अदाणी समुहाच्या बाजार भांडवलात १८.५ टक्क्यांची घसरण झाली. मंगळवारपासून आतापर्यंत अदाणी समुहाने ४.२ लाख कोटी रुपयांची घट नोंदवली आहे.

अदाणी समुहामधील ९ पैकी ४ कंपन्यांचे स्टॉक शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत लोअर सर्किटपर्यंत घसरले. दुपारी 3 वाजता अदाणी ट्रान्समिशन, अदाणी आणि अदाणी टोटल गॅसचे शेअर्स प्रत्येकी २० टक्क्यांनी घसरले, तर अदाणी ग्रीन एनर्जी आणि अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्स अनुक्रमे १९.९ टक्के आणि १९.३ टक्क्यांनी घसरले. यासह अदाणी पोर्ट्स (-१७.७ टक्के), अंबुजा सिमेंट्स (-१७.३ टक्के) आणि एसीसी (-१४.३ टक्के) देखील दिवसभरात वेगाने घसरले. अदाणी पॉवर आणि अदाणी विल्मारचे शेअर्सही लोअर सर्किटमध्ये पोहोचले होते. हे शेअर्स प्रत्येकी ५ टक्क्यांनी घसरले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या