श्रीरामपूर : दि.२८ डिसेंबर रोजी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या संशोधन फेलोशिप विषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती.
संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशीप एक प्रकारे पैशांची उधळपट्टी आहे. हे "साले पीएचडी वाले" असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केले, या वक्तव्याचा महाराष्ट्रभर संशोधक विद्यार्थी निषेध व्यक्त करत आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उच्च शिक्षण घेणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसोबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दांमध्ये पोस्टर दाखवून श्रीरामपूरात गांधी पुतळ्यासमोर निषेध व्यक्त केला. देशाच्या व राष्ट्राच्या विकासामध्ये संशोधक विद्यार्थ्यांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, संशोधकामुळे नवनिर्मिती होते व देशाच्या प्रगतीला चालना मिळते त्यामुळे संशोधकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. संशोधकांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करून छगन भुजबळ यांनी खूप मोठी चूक केली आहे, त्यांनी सर्व संशोधकांची माफी मागावी,संशोधन करणे म्हणजे काय तांदूळ चोरणे इतकं सोपं नाहीये, भ्रष्टाचार केलेल्या व्यक्तींनी उच्च शिक्षणावर न बोललेले बरे असे मत अभाविप चे प्रथमेश जोशी यांनी व्यक्त केले.
छगन भुजबळ यांनी संशोधक विद्यार्थ्यांची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रभर संशोधक विद्यार्थ्यांचा रोष पत्करावा लागेल असे अभाविप चे महेश तारगे यांनी सांगितले.
संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशीप ही नियमानुसारच दिली गेली असून राष्ट्रीय स्तरावर सुद्धा अशा पद्धतीच्या व राज्यांमध्ये सुद्धा अनेक संस्था संशोधन व्हावे यासाठी फेलोशीप देतात. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनावर अधिक भर देण्यात आला असून राज्यांमध्ये मात्र अशा माजी मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नाराजी पसरली आहे यावेळी अभाविप चे सुयोग खपके,सुजित भाले,शुभम खंदारे,साहिल जोशी,प्रतिक घोगरे,अमित मुथ्था,अनिल थोरात आदि.कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या