डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास

पंतप्रधान मोदी यांचे उद्गार : मुंबईत 40 हजार कोटींच्या कामाचे उद्घाटनमुंबई: डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास सुरू असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मुंबई दौऱ्यावार असताना बीकेसीमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध ४० हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले.
नरेंद्र मोदी म्हणाले, देशभरात रेल्वेला आधुनिक मिशन मोडवर आणण्याचे काम सुरू आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटीला देखील यातून फायदा होतो आहे. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारला सामान्य माणसालाही तीच आधुनिक सुविधा आणि विकासाच्या गतीचा अनुभव द्यायचा आहे. रेल्वे स्थानकांसह विमानतळांसारखं विकसित केलं जातं आहे. आता देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. त्याच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकासही केला जातो आहे. देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे मुंबईचा अभूतपूर्व विकास होतो आहे. तसंच मुंबईला भविष्यासाठी तयार करणं ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मुंबईकरांच्या प्रत्येक समस्येला मी समजू शकतो. भाजपाचे सरकार असो किंवा एनडीएचे सरकार असो आम्ही विकासाच्या पुढे राजकारण कधीही आणत नाही. राजकीय स्वार्थासाठी विकासात अडथळे आणत नाही, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भारत देश मोठी स्वप्नं पाहू शकतो आहे ती स्वप्नं पूर्ण करण्याचं साहस करू शकतो. आपला एक मोठा कालखंड गरिबीची चर्चा करण्यात आणि जगातल्या देशांकडून मदत मागण्यात गेला. मात्र आता जगाला भारताच्या विविध संकल्पांवर विश्वास बसू लागला आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यानंतर आधुनिक भारत ही संकल्पना पुढे आली आहे. भारताबाबत जगभरात सकारात्मकता आहे. कारण सगळ्या जगाला हे समजलं आहे की भारत देश आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याचा सदुपयोग करतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
स्वराज्य आणि सुराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे तोच विचार आम्हीही पुढे घेऊन चाललो आहोत. या देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास आम्ही करतो आहोत. मुंबईच्या विकासाशी संबंधित ४० हजार कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि शिलान्यास करण्यात आला आहे. मुंबईकरांसाठी अत्यावश्यक असलेली मेट्रो असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसाचं नुतनीकरण असो, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असो या सगळ्या योजना मुंबईच्या विकासात भर घालणाऱ्या आहेत. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या