महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेतुन पुणेकरांची तब्बल १ कोटींची वार्षिक बचत

पुणे : महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजने अंतर्गत वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ '-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या पुणे परिमंडलातील पर्यावरणस्नेही ९२ हजार ८१३ ग्राहकांकडून तब्बल एक कोटी ११ लाख ३७ हजार ५६० रुपयांची वार्षिक बचत सुरु आहे. पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी राज्यात या योजनेमध्ये आघाडी घेतली आहे. गेल्या २० दिवसांमध्ये पुणे परिमंडलामधील २६८१ ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.  

महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त '-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते 'गो-ग्रीन'मधील ग्राहकांना '-मेल'द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच 'एसएमएस'द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे. 'गो-ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे’ असे आवाहन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरात ४९ हजार ४९२ ग्राहक 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये हडपसर-१ उपविभागामधील ५५४४, वडगाव धायरी- ४८७५, धनकवडी– ४५७१ व विश्रांतवाडी उपविभागामध्ये ३६५८ ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. पिंपरी चिंचवड शहरात 'गो-ग्रीन'मध्ये २७ हजार १९९ ग्राहक सहभागी आहेत. यामध्ये सांगवी उपविभागातील सर्वाधिक ८३१९ तर आकुर्डी- ५१६४, चिंचवड उपविभागामध्ये ५३४२ ग्राहक मोठी संख्येने योजनेत सहभागी आहेत. तसेच पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये १६ हजार १२२ ग्राहकांनी 'गो-ग्रीन'मध्ये सहभाग घेतला आहे. यामध्ये हडपसर ग्रामीण उपविभागातील ४३५३ ग्राहकांची सर्वाधिक संख्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या