बारामतीचे कृषी प्रदर्शन पाहून कृषी मंत्री सत्तार प्रभावित

राज्यात इतरत्रही अशा प्रकारची प्रदर्शने व्हावीत : अब्दुल सत्तार 



बारामती : राज्यामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी पाहिलेल्या प्रदर्शनापेक्षा बारामतीचे कृषी प्रदर्शन हे अत्यंत वेगळं आहे. नवखं आहे आणि राज्याला नव्हे तर देशाला दिशा देणारे आहे असे मत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बारामतीतील कृषी प्रदर्शन पाहिल्यानंतर व्यक्त केले.
    बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषीक प्रदर्शनास (दि:१९) रोजी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. त्यांनी कृषी केंद्राने  आयोजित केलेल्या १७०  एकर प्रक्षेत्रावरील पिकांच्या जिवंत प्रात्यक्षिकांसह कृषी क्षेत्रातील नव तंत्रज्ञान पाहिले आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, केंद्र प्रमुख डॉ. धीरज शिंदे  यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
     सत्तार म्हणाले, देशाच्या इतर राज्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर तेथील कृषी शिक्षण आणि विस्तारामध्ये खाजगी विद्यापीठांना मान्यता आहे. परंतु महाराष्ट्रात तशी मान्यता नाही. त्यामुळे अशी मान्यता असेल तर कृषी संशोधनाला बाळ मिळेल आणि त्यातून अधिक चांगलं कृषी क्षेत्रासाठी भरीव काम करता येईल. यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून यासंदर्भातील प्रस्तावाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. भविष्यात खाजगी कृषी विद्यापीठे यावीत आणि त्यांनी कृषी क्षेत्राचा विस्तार आणि विकास करावा असं माझं देखील स्वतःचं मत आहे असं ते म्हणाले.
 ते म्हणाले की, बारामतीतील कृषी प्रदर्शन पाहिल्यानंतर मी राजेंद्र पवार यांना विनंती केली की, त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ या काहीशा शेतीमध्येमागे असलेल्या भागातील शेतीला सुधारण्यासाठी देखील प्रयत्न करावेत. त्यांनी त्यांचा काही प्रयोग त्या ठिकाणी केल्यास तेथील शेतकऱ्यांना देखील शेती विकासासाठी अधिक दिलासा मिळेल असे माझे स्वतःचे मत आहे.
    कृषिक प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक पिकांच्या नवीन वाणांचे उत्पादन पाहिल्यानंतर अब्दुल सत्तार देखील भारावून गेले. त्याचबरोबर बारामतीत अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनाची व्यवस्था पाहून मी अतिशय प्रभावीत झालो असून आजवर मी राज्यात गेल्या ३० वर्षात जेवढी प्रदर्शने पाहिली, त्यामध्ये जिवंत पिकांचा प्रात्यक्षिकांचा अनुभव अजिबात नव्हता. मात्र या ठिकाणी आल्यानंतर शेतीत नेमके काय करायला हवे, याचा योग्य तो मूलमंत्र शेतकऱ्यांना मिळेल याच्यावर माझा विश्वास बसला असे ते म्हणाले. 
    बारामतीतील कृषी व पशुसंवर्धनावरील आणि महिला शिक्षणावरील काम पाहून अब्दुल सत्तार भारावले. दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी बारामतीतील अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने महिला शिक्षणाबाबत होत असलेल्या कामाची सकाळी केलेल्या पाहणीची माहिती सांगितली. 
    ते म्हणाले की मी महिला शिक्षणावरील ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, कै. आप्पासाहेब पवार, राजेंद्र पवार यांनी अखंडपणे केलेल्या या कामामुळे मी प्रभावित झालो आहे. देशी गोवंश सुधार प्रकल्प पाहिला आणि मी अक्षरशः प्रभावित झालो. महिलांना त्यांच्या पायावर उभा करण्याचे सुनंदा पवार या करत असलेल्या कामाची मला अगोदरच माहिती होती. मात्र या ठिकाणी आल्यानंतर हे काम किती विस्तारित आणि किती मोठे आहे हे मला पाहायला मिळाले असे देखील अब्दुल सत्तार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या