श्रीरामपूर पंचायत समितीची नूतन इमारत धुळखात

ग्रीन बिल्डिंग संकल्पना ; महिलांसाठी विश्रांती कक्षहीश्रीरामपूर :  कृषिमंत्री अब्दुल सत्तार व  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावूनही  तालुका पंचायत समितीची नूतन अद्ययावत इमारत गेल्या दोन वर्षापासून उर्वरित निधी अभावी धुळखात पडून आहे.
अंदाजे ७ कोटी रुपयांच्या या विस्तारित अशा देखण्या इमारतीचे बांधकाम तसेच रंगकाम अलीकडेच पूर्ण झाले आहे. 
 तत्कालीन महसूल मंत्री काँग्रेसचे विद्यमान विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात ही इमारत प्रस्तावित होती.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आणि  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत या इमारतीचा भूमिपूजन सोहळा मागे पार पडला होता.  या इमारतीस संरक्षक भिंत नसल्यामुळे तसेच आतील संपूर्ण विभागांचे फर्निचर्स होणे बाकी असल्यामुळे या इमारतीचा अधिकाऱ्यांसाठीचा वापर तूर्तास लांबला आहे.
    बांधकाम, पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभाग यासह सदस्यांसाठी विस्तीर्ण असा बैठक हॉल याशिवाय सभापती उपसभापती आणि गटविकास अधिकारी यासह सर्व अधिकाऱ्यांना स्वतंत्र बैठक व्यवस्थेची या इमारतीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फर्निचर साठी अंदाजे ३ कोटी २३ लाख रुपये तर संरक्षक भिंतीसाठी अंदाजे १ कोटी ६१ लाख रुपयांची आवश्यकता आहे. याशिवाय इलेक्ट्रिक कामासाठीही निधीची गरज असून मंत्रालय स्तरावर या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे.गटविकास अधिकारी अनंत परदेशी आणि उप अभियंता रवींद्र पिसे यासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र सद्यस्थितीत ही इमारत अधिकाऱ्यांसाठी वेट अँड वॉच अशी ठरली आहे.
संगमनेर अकोले येथील पंचायत समितीच्या इमारती पेक्षाही या इमारतीचे क्षेत्रफळ मोठे असून या इमारतीत सर्वांसाठी असलेली पार्किंग व्यवस्था या इमारतीचे खास वैशिष्ट्य असणार आहे.
    सध्याची इमारत १९६६ मध्ये बांधण्यात आली आहे. १९७८ व १९८४ मध्ये या इमारतीची दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र, त्याकाळच्या सोयीनुसार बांधण्यात आलेली ही इमारत जुनी तर झाली आहेच, शिवाय गैरसोयीची आणि अपुरीही पडत होती. त्यामुळे नवी इमारत बांधणे अत्यावश्यक होते. जिल्हा परिषदेने यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. तळ मजला पार्किंग, पहिला मजला आणि दुसरा मजला अशी ही इमारत बांधण्यात आली आहे. ग्रीन बिल्डिंग संकल्पनेनुसार ही इमारत बांधण्यात आली आहे. नैसर्गिक प्रकाश योजना, जलपुनर्भरण, पर्यावरणपूर्वक बांधकाम साहित्य, पाणी व वीज यांचा काटकसरीने वापर, यावर लक्ष देण्याच्या सूचना होत्या. इमारतीत महिला पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष आणि प्रसाधनगृहही  आहे. 
दरम्यान, राजकीय स्थित्यंतरात ही इमारत वापरण्यासाठी आता लांबणीवर पडणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या