एक्झाम वारियर्सच्या माध्यमातून भयमुक्त वातावरणात अभ्यासाचा संदेश : राज्यपाल





मुंबई : प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अभ्यास भयमुक्त वातावरणात केला पाहिजे, हाच संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वारियर्स’ या पुस्तकातून मिळतो”, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

नॅशनल बुक ट्रस्टतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित 'एक्झाम वॉरियर्स' पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन आज राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमास शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, आपल्या देशाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. अशा या आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'एक्झाम वॉरियर्स' या पुस्तकाच्या माधमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपला अमूल्य असा भारत देश समजून घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून आपला अभिमान बाळगला पाहिजे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी विद्यार्थ्यांनादेखील योद्धा म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थी योद्ध्यांनी भयमुक्त होवून परीक्षा द्याव्यात. या पुस्तकाची प्रत प्रत्येक ग्रंथालयास द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या