देशभरात मोदी करिश्मा कायम

इंडिया टुडे सी व्होटरचे लोकसभा मतदारसंघ सर्व्हेक्षण; एनडीएला २९८ तर यूपीएला मिळतील १५३ जागा



नवी दिल्ली :
इंडिया टुडे सी व्होटर यांच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अजूनही सर्वोच्च स्थानी असून देशभरात मोदी यांचा करिश्मा अद्याप कायम असल्याचे दाखविण्यात आले. लोकसभेच्या आता निवडणुका झाल्या तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला २९८ जागा मिळतील. यूपीएला १५३ जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एनडीएचा मतांचा टक्का ४२.८ टक्के असेल तर यूपीएचा टक्का हा २९.६ टक्के असेल.


महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीला लोकसभेत ३४ जागा मिळतील, तर भाजपाला फक्त १४ जागा मिळतील, असा अजब दावा करण्यात आला आहे. 
लोकसभेत देशभरात काय वातावरण असेल. एनडीए, यूपीएला कसे समर्थन लोकांकडून मिळेल, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती यश मिळेल, भाजपाची काय स्थिती असेल अशा विविध मुद्द्यांवर काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

भाजपाला बहुमतापेक्षा १०-११ जाग जास्त मिळतील, असेही या निष्कर्षात म्हटले आहे. याचा अर्थ २८४ जागा भाजपाला मिळतील असा अंदाज असून काँग्रेसला ६८ तर इतरांना मिळून १९१ जागा मिळतील.
भारतात आज सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण याचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना ३९ टक्के लोकांची पसंती आहे तर अरविंद केजरीवाल १६ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहेत. ममता बॅनर्जी या ७ टक्क्यांसह तिसऱ्या तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या १० मध्ये स्थान मिळविले आहे. त्यांना २.२ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या