फडणवीसांचे एका दगडात अनेक पक्षी!

सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा
विखे पिता पुत्रांसाठी डोकेदुखी...
कानडे कांबळे लोखंडे प्रचारापासून दूरच...


श्रीरामपूर :
"एका दगडात दोन पक्षी" अशी एक जुनी म्हण आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एका दगडात एक, दोन  नव्हे तर अनेक पक्षी घायाळ केले आहेत. काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीला भाजपचा उघड पाठिंबा देत फडणवीस यांनी काँग्रेसची जिल्ह्यात शकले उडवून दिली आहे. तांबे यांची जवळीक राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची डोके दुखी ठरणारी ठरणार आहे. तसेच नगर जिल्ह्यातील काँग्रेस खिळखिळी करण्याचे भाजपाचे मनसुबे यानिमित्ताने पूर्ण झाले आहेत.

नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक एका दिवसावर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटीलविरुद्ध अपक्ष सत्यजित तांबे अशी मोठी चुरस अंतिम टप्प्यात निर्माण झाली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार विधिज्ञ सुभाष जंगले यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदाना असल्याने येथील मतदानावर विजय निश्चित होणार आहे.
प्रारंभी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक महाविकास आघाडीतील प्रमुख उद्धव ठाकरे, छगन भुजबळ असे  बलवान नेते मैदानात उतरल्याने निवडणूकीत रंग भरला आहे.
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारीणी बरखास्त केली आहे. काँग्रेस कार्यकारणी बरखास्त झाल्यामुळे भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नगर जिल्ह्यात हुरूप निर्माण झाला आहे.
या निमित्ताने विखे पिता-पुत्रांची कोंडी, काँग्रेसची झालेली शकले आणि नगर जिल्ह्यात भाजपाचे वाढणारे मोठे बळ अशा प्रकारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एका दगडात एक नव्हे तर अनेक पक्षी घायाळ केले आहेत.

तांबे यांनी विजयाची माळ गळ्यात घातली तर काँग्रेस मधील जुना विखे थोरात संघर्ष पुन्हा भाजपमध्ये पुढे आल्यास नवल वाटू नये. जिल्ह्यात विखे पिता पुत्रांची क्रेझ कमी करण्यासाठी भाजपाने हा टाकलेला खूप मोठा डाव आहे.
आगामी काळात अनेक स्वयत्त संस्थांसह नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद-  पंचायत समित्या आणि अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुका होईपर्यंत काँग्रेसची मोट बांधली न गेल्यास या सर्व त्या निवडणुकांमध्ये भाजपाला मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे.
सत्यजित तांबे यांच्यासाठी देवेंद्र फडवणीस नगर जिल्ह्यात काय चमत्कार करतात का याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी सत्यजित यांना पाठिंबा दर्शवत विखे यांची मोठ्या प्रमाणात कोंडी करण्याची व्यूहरचना आखण्यात आली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील तसेच मराठा क्रांती मोर्चा साठी मोठी रणनीती आखणारे एडवोकेट सुभाष जंगले यांना मिळत असलेला मोठ्या प्रमाणातील पाठिंबा हा लोकशाहीत चमत्कार घडवू शकतो, अशी ही मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

-------

दिग्गज नेते प्रचारापासून दूर

राज्य पातळीवर या सर्व मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत असल्या तरी स्थानिक नगर जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक वगळता खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार भानुदास मुरकुटे ,जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे ,माजी आमदार चंद्रशेखर कदम, शिवाजी कर्डिले, आ. प्राजक्त तनपुरे, रावसाहेब म्हस्के, आ. शंकरराव गडाख, आ. आशुतोष काळे, वैभव पिचड, अरुण कडू, घुले बंधू, विठ्ठलराव लंघे अशी सारी मंडळी मात्र प्रचारापासून पूर्णतः दूर आहेत.
___________

काँग्रेस आणि भाजपचा उमेदवार एकच

नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यानंतर संपूर्ण काँग्रेस थोरात यांच्या पाठीशी एकवटली. आता थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार आहेत. थोरात समर्थक काँग्रेस कार्यकर्ते तांबे यांचाच प्रचार करत आहे. भाजपने पदवीधर निवडणुकीत उमेदवार न देता तांबे यांना अधिकृतपणे पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस व भाजप यांचा उमेदवार एकच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याचा तांबे यांना फायदा होणार की तोटा? हे मात्र निकालात समजेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या