नॉन बँकिंग संस्थांमध्ये अडकले जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचे 350 कोटी

गुंतवणूकदारांचा 27 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा


नगर : मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील गुंतवणुकदारांना भूरळ घालत कोट्यवधींची रक्कम अडकवून ठेवणाऱ्या पीसीएल, मैत्रेय, समृद्ध जीवन, सहारा, साईप्रसाद, बीएनपी, एन.आय.सी.एल व इतर नॉन बँकिंग गुंतवणूक कंपन्यांनी गुंतवणूकदारांची रक्कम व्याजासह परत करावी, या मागणीसाठी गुंतवणूकदार ठगी पीडित जमाकर्ता परिवाराच्या वतीने 27 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजता बडस्‌‍ ॲक्ट 2019 अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

बसस्थानकावरील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यास व मार्केट यार्डसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा निघेल. या मोर्चामध्ये 500 नागरिक व महिलांची उपस्थिती असणार आहे. याबाबतचे निवेदन संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांना तपजप संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास देशमुख, उपाध्यक्ष अजिनाथ शेंडकर, महासचिव विलास एळवंडे, सचिव गणेश हजारे, सदस्य प्रकाश चटाले, भाऊसाहेब जाधव आदींच्या सह्या आहेत.
विविध संस्थांकडे नगर जिल्ह्यातील 1 लाख 50 हजार गुंतवणूकदारांचे सुमारे 350 कोटी रुपये अडकले आहेत. जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना जास्तीचा परतावा, कमी वेळेत जास्त परतावा, गुंतवणूकदारांच्या नावावर गुंतवणुकीच्या रकमेतून जमिनीची प्रॉपर्टी अशी वेगवेगळी आमिषे दाखवून पल्स, समृद्ध जीवन, बीएनपी, निर्मल, मैत्रेय जनसहारा, पॅन कार्ड क्लब, आरोग्य धनवर्षा आदी विविध नॉन बँकिंग संस्थांनी भुरळ घालत कोट्यवधींची माया जमा करून गाशा गुंडाळला.
या कंपन्यांकडे आपली गुंतवणुकीची रक्कम मागितली असता, थोडे दिवस थांबा असे सांगितले जाते. मात्र, प्रत्येक वेळी हेच उत्तर दिले जात असल्याने गुंतवणूकदारांनी एकत्र येत या विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. 2014 ते 2016 या काळात सर्व कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळून गुंतवणूकदारांची फसवणूक केली. यातील काही कंपनीचालकांना तुरूंगवास झाला. मात्र, त्यानंतर त्यांना जामिन मिळून ते खुलेआम फिरताहेत. अनेक गुंतवणूकदारांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही व्हावी व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळावेत, अशी गुंतवणूकदारांची मागणी आहे. धडक मोर्चा यशस्वीतेसाठी विलास देशमुख, अजिनाथ शेंडकर, विलास एळवंडे, गणेश हजारे, भाऊसाहेब जाधव, प्रकाश चटाले यांच्यासह गुंतवणूकदार प्रयत्नशील आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या