नागपूर खंडपीठाने बजावली नोटीस
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नोटीस बजावल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यापीठांच्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदांमध्ये राज्यपालांकडून करण्यात आलेल्या सदस्यांच्या नियुक्त्या आधीच वादात सापडल्या आहेत. त्यानंतर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पुन्हा एकदा नवीन नियुक्तीवरून वादात सापडले आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रातील डॉ. प्रशांत कडू यांची आंतरविद्याशाखीय शाखेच्या अधिष्ठातापदी केलेली निवड वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे सांगितले जात आहे.
नागपूर खंडपीठाने दोन आठवड्यांत मागितले उत्तर
कुलगुरूंनी अपात्र व्यक्तीची नियुक्ती केल्याचा दावा करत माजी अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी थेट राज्यपाल व कुलपती भगतसिंह कोश्यारी, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आणि डॉ. प्रशांत कडू यांना प्रतिवादी केले आहे. या याचिकेवरील युक्तिवाद झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यपालांसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली असून दोन आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
0 टिप्पण्या